Supriya Sule: “भ्रष्टाचाराचे आळ घेतले, त्यांच्यासोबतच सरकारमध्ये गेले”; सुप्रिया सुळेंची मोदी-शाहांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 05:06 PM2023-03-09T17:06:38+5:302023-03-09T17:06:48+5:30
Supriya Sule: ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ या घोषणेचे काय झाले, अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
Supriya Sule: नुकत्याच झालेल्या नागालँडच्या निकालात NDPP आणि भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. नागालँड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ उमेदवार निवडून आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने न मागता सरकारला पाठिंबा दिला आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीने घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली जात असून, खासदार सुप्रिया सुळे यांनी आता मेघालयमध्ये भाजप सत्तेत सहभागी झाल्यावरून पलटवार केला आहे.
ज्या सरकारवर एक आठवड्यापूर्वी तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले. निवडणूक निकालानंतर त्याच पक्षाच्या नेत्यांसोबत सरकार स्थापन करता, हे कसे होऊ शकते, अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेऊन सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न विचारला आहे. मेघालयचे सध्याचे सरकार सर्वाधिक भ्रष्टाचारी असल्याचे खुद्द अमित शाहच म्हणाले होते. आता त्यांनी त्याच पक्षासोबत सरकार स्थापन केले आहे. त्यांनी केलेल्या ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ या घोषणेचे काय झाले, असा खोचक सवालही सुप्रिया सुळे यांनी केला.
हा माझा सोपा आणि सरळ प्रश्न आहे
मेघालयचा शपथविधी बघत होते. काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी मेघालयातील सगळ्यात करप्ट सरकार आताचे होते, असे म्हटले होते. त्यानंतर निवडून आल्यावर ज्यांच्याबद्दल अमित शाह बोलले, त्यांच्याच बरोबर सरकार स्थापन केले. मी संसदेत हेच बोलणार आहे. २०१४ मध्ये खूप विश्वासाने पंतप्रधानांनी चांगली गोष्ट सांगितली होती. काही बाबतीत त्यांनी शब्द दिला होता. ना खाऊंगा ना खाने दुंगा… असे म्हणाले होते. त्यामुळे जेव्हा अमित शाह एखाद्या सरकारला सर्वात भ्रष्टाचारी म्हणता आणि १० दिवसानंतर त्याच सरकारसोबत सरकार बनवता. मग त्या घोषणेचे काय झाले, हा माझा सोपा आणि सरळ प्रश्न आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
दरम्यान, मेघालयमध्ये कोनराड संगमा हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोनराड संगमा यांच्या एनपीपीला २६ जागा मिळाल्या तर भाजपने फक्त २ जागा जिंकल्या. मेघालयात कोनराड संगमा यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले असून भाजप, युनायटेड डेमोक्रेटिक पार्टी आणि पिपल्स डेमोक्रेटिक फ्रंट यांनी एनपीपीच्या नेतृत्वाखालील युतीला पाठिंबा दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"