Supriya Sule : "साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही"; सुप्रिया सुळेंची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 12:03 PM2022-12-06T12:03:51+5:302022-12-06T12:17:25+5:30

NCP Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याच दरम्यान एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. शरद पवारांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण करून दिली आहे.

NCP Supriya Sule facebook post Over sharad pawar belgaum agitation | Supriya Sule : "साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही"; सुप्रिया सुळेंची 'ती' पोस्ट चर्चेत

Supriya Sule : "साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही"; सुप्रिया सुळेंची 'ती' पोस्ट चर्चेत

googlenewsNext

गेल्या काही दिवसांत सीमाभागात घडलेल्या काही घडामोडी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, हा सीमावाद चिघळू नये म्हणून मंत्र्यांना बेळगावात न पाठवण्याची विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली होती. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना बेळगावात न जाण्याची सूचना केल्याने हा दौरा रद्द झाल्याची चर्चा आहे. 

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) यांनी याच दरम्यान एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. शरद पवारांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण करून दिली आहे. "कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यान पुन्हा एकदा सीमावाद सुरु झाला असताना महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा कर्नाटकच्या तंबीनंतर रद्द करण्यात आला. ही बातमी वाचली आणि मला आदरणीय पवार साहेबांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण झाली. साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही. खुद्द एस एम जोशी देखील साहेबांच्या पाठीवर उमटलेले वळ पाहून हळहळले होते. तो काळच तसा होता" असं म्हटलं आहे. 

"सीमाभागात राहणाऱ्या जनतेवर कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत होती. कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य केल्याची घोषणा केली. याविरोधात मोठं आंदोलन उभं करण्याचा निर्णय समितीने घेतला. खुद्द एस एम जोशी यांनी १९८६ मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत  तीन दिवसांच्या साखळी आंदोलनाचं नियोजन केलं. महाराष्ट्रातले नेते बेळगावमध्ये जावून भर चौकात निषेध नोंदवतील, असं ठरविलं. अर्थातच याला कर्नाटक सरकारने विरोध केला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी केली."

"बेळगावात पोहोचले पण कुणालाही थांगपत्ता लागला नव्हता"

"पहिल्या दिवशीच्या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय पवार साहेबांकडे  होते.बेळगावात दाखल होण्यासाठी साहेबांनी एक शक्कल लढविली. ते कोल्हापुरात गेले. तिथून एक फियाट गाडी घेतली. सोबत बाबासाहेब कुपेकर आणि एक ड्रायव्हर घेतला. साहेबांनी  स्वतः ड्रायव्हर असल्याची बतावणी केली. खऱ्या ड्रायव्हरला मागे मालकाच्या जागी बसवलं. तिघे जण निघाले. चेकपोस्टवर पोलिसांनी चौकशी केली परंतु त्यांना काहीच कळलं नाही.साहेब बेळगावात पोहोचले पण कुणालाही थांगपत्ता लागला नव्हता."

"साहेबांच्या पाठीवरचे मारहाणीचे वळ पाहून एसएम हळहळले"

"बेळगावात जमावबंदी होती. साहेब पूर्वीच पोहोचले असल्यामुळे अरविंद गोगटेंच्या घरी त्यांनी मुक्काम केला. आंदोलनाची वेळ झाली. बरोबर ११ वाजता राणी चेन्नमा चौकात लोक जमू लागले. अचानकपणे हजारो लोक जमल्याने पोलिस गोंधळले. संतप्त पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. साहेब, बाबासाहेब कुपेकर, आदींना पोलिसांनी बेदम मारहाण केली. साहेबांना हिडकल डॅमच्या परिसरातील विश्रामगृहावर आणण्यात आलं. तेथेही लोक जमा झाले. वयस्कर एस एम जोशी साहेबांना भेटायला गेले. त्यांनी त्यावेळी साहेबांच्या पाठीवरील पोलिसांनी मारहाण केलेले वळ पाहिले. ते पाहून एसएम हळहळले होते. हा भारावलेला काळ कुठे आणि आजचा काळ कुठे? सारंच ३६० अंशात बदललंय" असं सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: NCP Supriya Sule facebook post Over sharad pawar belgaum agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.