“छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही”: सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 11:06 AM2022-02-28T11:06:47+5:302022-02-28T11:08:49+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला आहे.
मुंबई: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने यावर आक्षेप नोंदवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाचा दाखला दिला आहे.
सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट करून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या एका निकालाचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार, तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे शरद पवार यांनी स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं… रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडविले हे जिजामातांच्या संस्कांरांनी… त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते. काही लोकांच्या हातात लेखणी होती, त्यामुळे या कर्तृत्वसंपन्न महामानवाला रामदासांनी घडविले अशी लेखणीची कमालकृत्ये केली, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. याशिवाय, शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचे मोठे योगदान असते, तसेच आपल्या समाजात गुरूचे मोठे स्थान असते. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटले की तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे, अशा आशयाचे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात बोलताना केले होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार...
— Supriya Sule (@supriya_sule) February 28, 2022
'तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. pic.twitter.com/nA6cJKo9Rl