Maharashtra Politics: “जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे अयोग्य, राजीनामा देणे...”: सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 01:31 PM2022-11-14T13:31:12+5:302022-11-14T13:32:24+5:30
Maharashtra News: जितेंद्र आव्हाड एक चांगले, संवेदनशील लोकप्रतिनिधी आहेत. पण...; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले.
Maharashtra Politics: ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने आव्हाड यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना, विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे टोकाचे पाऊस असून, ते अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
मुंब्रा मतदारसंघातील जनतेने जितेंद्र आव्हाड यांना निवडून दिले आहे. ते एक चांगले लोकप्रतिनिधी आहेत. जितेंद्र आव्हाड एक संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यांच्या मनाला प्रचंड वेदना होत आहेत, हे मान्य आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा विचार मनातून काढून टाकावा. आमदारकीचा राजीनामा देणे, हा उपाय नाही, असे सल्ला सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे टोकाचे पाऊल उचलणे, हे अयोग्य
जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील व्हिडिओ स्वत: तीन-चारवेळा पाहिला. हा प्रकार घडला तेव्हा आजुबाजूला प्रचंड गर्दी आणि पोलीस यंत्रणा होती. जितेंद्र आव्हाड यांनी त्यावेळी गर्दीत असताना श्रीकांत शिंदे यांनाही हात लावला होता. त्यानंतर संबंधित महिलेला बाजूला केले. त्या गदारोळात नक्की काय झाले, हे समजले नाही. पण यामध्ये महिलेचा विनयभंग कसा होऊ शकतो? हा प्रकार गैरसमजातून झाला आहे. संबंधित महिलेची बाजू नक्की ऐकून घेतली पाहिजे. पण जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे टोकाचे पाऊल उचलणे, हे अयोग्य आहे, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आम्हीदेखील एखाद्या कार्यक्रमाला जातो तेव्हा थोडफार जॉसलिंग होते. मी भारत जोडो यात्रेसाठी गेले होते, तेव्हाही असा प्रकार घडला. तेव्हा अनेक मुले माझा हात ओढत होती. मी आता त्याला विनयभंग म्हणायचा का? ते लोकांचे आपल्यावर असलेले प्रेम असते. महाराष्ट्रात लोकं बंदुकी घेऊन महिलांना शिव्या घालतात. तेव्हा आम्ही विनयभंगाच्या केसेस घालत नाही. मी मध्यमवर्गीय आणि सुसंस्कृत कुटुंबात वाढले आहे. माझ्या आईने मला, एक गोष्ट शिकवली आहे की, गर्दीमध्ये गेलीस आणि धक्का खायची वेळ आली तर बाजूला उभी राहा, दोन मिनिटं उशीर झाला तरी चालेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"