Supriya Sule on Navneet Rana: “माझी सगळ्या गोष्टींवर श्रद्धा, पण...”; राणा दाम्पत्याच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 02:02 PM2022-04-23T14:02:26+5:302022-04-23T14:03:45+5:30
Supriya Sule on Navneet Rana: नवनीत राणा यांच्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळे यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.
इस्लामपूर: नानाविध घटनांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेली भूमिका, ठाकरे सरकारला दिलेले अल्टिमेटम आणि विरोधकांनी राज यांच्यावर सोडलेले टीकास्त्र सुरू असतानाच आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मातोश्रीबाहेर (Motoshree) हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठणाचा निर्धार बोलून दाखवला. यामुळे शिवसैनिक चांगेलच आक्रमक झाले आहेत. खार आणि वांद्र परिसरात यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावर भाष्य केले आहे.
इस्लामपूरमध्ये कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीमध्ये यशवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठणाबाबत घेतलेल्या भूमिकेवर विचारणा केली असता त्यावर बोलताना, माझी सगळ्या गोष्टींवर श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
मला बाकीचे खासदार काय करतात याचा अभ्यास नसतो
तुम्हाला खरे सांगू का? माझ्या मतदारसंघात मला इतकी कामे असतात, की मला बाकीचे खासदार काय करतात याचा फारसा अभ्यास नसतो. लोकसभा मतदारसंघ, त्याचा व्याप फार मोठा असतो, असे सांगत सुप्रिळा सुळे यांनी यावर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. दिल्लीतील नवनीत राणांच्या कार्यपद्धतीविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नवनीत राणा दिल्लीत खूप सक्रीय आहेत. खूप वेळा भाषण करतात. माझ्या दिल्लीतल्या सहकारी आहेत.
दरम्यान, राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा वाचायची असेल तर आपापल्या घरात वाचावी. दुसऱ्याच्या घरात जाऊन विनाकारण ड्रामा करायची गरज नाही. मातोश्रीवर जाऊन शिवसैनिकांचा राग ओढवून घेऊ नये. धर्माचा आदर असणारे, प्रेम करणारे कमी आहेत का, या दोघांनीच धर्म सांभाळण्याचा मक्ता घेतला आहे का? राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यास राणा दाम्पत्य जबाबदार असेल. पाठीमागे कुणीतरी असणार, कुणाची तरी सुपारी घेतली असणार, कोण मागे आहे याचा शोध घ्यावा लागेल. स्वतःहून ते इतके धाडस करू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.