Supriya Sule : "मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिल्ली वाऱ्या करायला वेळ आहे, पण..."; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 11:21 AM2023-10-04T11:21:16+5:302023-10-04T11:33:45+5:30
NCP Supriya Sule Slams Maharashtra Government : नांदेडनंतर आता नागपूरमध्ये देखील काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली. त्यानंतर मंगळवारी अत्यवस्थ असलेल्या आणखी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 8 बालकांचा समावेश आहे. दोन दिवसांत तब्बल 35 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अत्यवस्थ असलेले 36 शिशुंसह 59 रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत.
मृत्यूच्या तांडवामुळे खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. राज्यातील सरकारी रुग्णालयामध्ये मृत्यूच्या अशा घटना आता समोर येत आहेत. नांदेडनंतर आता नागपूरमध्ये देखील काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिल्ली वाऱ्या करायला वेळ आहे, पण या रुग्णालयांना भेट देण्यासाठी वेळ नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "औषधांचा तुटवडा, आरोग्य व्यवस्था कोलमडून पडलीय, हे सरकार मात्र झोपेचं सोंग घेऊन पडलंय" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. "'भय इथले संपत नाही' आणि कोडगं सरकार आपल्या बेजबाबदार मंत्र्यांचा राजीनामा काही घेत नाही. ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर नंतर आता नागपूरात देखील 25 रुग्णांचा मृत्यू झाला."
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिल्ली वाऱ्या करायला वेळ आहे, पण या रुग्णालयांना भेट देण्यासाठी वेळ नाही. त्यांना कारण त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील जनतेचे जीव स्वस्त झाले आहेत. औषधांचा तुटवडा आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडून पडलीय आणि हे सरकार मात्र झोपेचं सोंग घेऊन पडलंय" असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"...तर महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांचा राजीनामा घ्यावा"
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोग्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्यावा असं देखील म्हटलं आहे. "आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंत यांची कामगिरी निराशाजनक नाही तर चिंताजनक आहे. आरोग्यदायी महाराष्ट्रासाठी एकनाथ शिंदे यांनी तात्काळ तानाजी सावंतांचा राजीनामा घ्यायला हवा" अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. यासोबतच आम्ही मृतांच्या नातेवाईकांना 5-10 लाख मदत दिली, असं म्हणून गेलेले जीव परत येत नाहीत असं देखील म्हटलं आहे.