Supriya Sule : "गोरगरिबांच्या जीवाचं सरकारला काहीच मोल वाटत नाही का?"; सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 12:00 PM2023-10-05T12:00:02+5:302023-10-05T12:54:41+5:30
NCP Supriya Sule Slams Maharashtra Government : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
राज्यातील नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयांत रुग्णांच्या झालेल्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली आहे. उच्च न्यायालयानेही याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेत बुधवारी स्वयंप्रेरणेने जनहित याचिका दाखल करून घेतली. या मृत्यूसाठी डॉक्टर, औषधांचा तुटवडा वा खाटांची कमतरता अशी कारणे दिली जात असतील तर ती मान्य नाहीत, अशा शब्दांत फटकारत न्यायालयाने राज्य सरकारकडून तपशिलात माहिती मागितली आहे.
आता, याप्रकरणात नांदेड रुग्णालयाचे डीन डॉ. एस.आर. वाकोडे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. "गरीब जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. या जबाबदारीचा सरकारने त्याग केला आहे का? गोरगरिबांच्या जीवाचं सरकारला काहीच मोल वाटत नाही का? असा संतप्त सवाल विचारला आहे.
शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी अब्जाधीश-कोट्यधीश जात नाहीत, पण गोरगरीब जनता जाते. कारण त्यांच्यासाठी शासकीय रुग्णालयांतील उपचार परवडणारे असतात. या गरीब जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. या जबाबदारीचा सरकारने त्याग केला आहे का? गोरगरिबांच्या…
— Supriya Sule (@supriya_sule) October 5, 2023
सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी अब्जाधीश-कोट्यधीश जात नाहीत, पण गोरगरीब जनता जाते. कारण त्यांच्यासाठी शासकीय रुग्णालयांतील उपचार परवडणारे असतात. या गरीब जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. या जबाबदारीचा सरकारने त्याग केला आहे का? गोरगरिबांच्या जीवाचं सरकारला काहीच मोल वाटत नाही का?" असं सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी याआधी देखील सरकारवर हल्लाबोल केला होता. "मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिल्ली वाऱ्या करायला वेळ आहे, पण या रुग्णालयांना भेट देण्यासाठी वेळ नाही" असं म्हणत निशाणा साधला होता. "औषधांचा तुटवडा, आरोग्य व्यवस्था कोलमडून पडलीय, हे सरकार मात्र झोपेचं सोंग घेऊन पडलंय" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. "'भय इथले संपत नाही' आणि कोडगं सरकार आपल्या बेजबाबदार मंत्र्यांचा राजीनामा काही घेत नाही. ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर नंतर आता नागपूरात देखील 25 रुग्णांचा मृत्यू झाला."
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिल्ली वाऱ्या करायला वेळ आहे, पण या रुग्णालयांना भेट देण्यासाठी वेळ नाही. त्यांना कारण त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील जनतेचे जीव स्वस्त झाले आहेत. औषधांचा तुटवडा आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडून पडलीय आणि हे सरकार मात्र झोपेचं सोंग घेऊन पडलंय" असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.