Supriya Sule : "प्रिय बाबा, तुम्ही सर्वांसाठी ऊर्जेचा अखंड स्रोत..."; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त लेकीची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 01:53 PM2022-12-12T13:53:17+5:302022-12-12T14:04:24+5:30
NCP Supriya Sule And Sharad Pawar : शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वडिलांबरोबरचा फोटो पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच "बाबा, तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा" असंही म्हटलं आहे. सोशल मीडियावर अनेकांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहें "प्रिय बाबा, तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात. समाजकारण, राजकारण या क्षेत्रांसह कौटुंबिक पातळीवर देखील तुम्ही आम्हा सर्वांचे आदर्श आहात. तुमच्या विचारांची स्वाभिमानी मशाल घेऊन आम्ही सर्वजण आपल्यासोबत अविश्रांत चालण्याचा प्रयत्न करीत आहोत. बाबा, तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" असं सुप्रिया यांनी म्हटलं आहे.
प्रिय बाबा,
— Supriya Sule (@supriya_sule) December 12, 2022
तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात. समाजकारण, राजकारण या क्षेत्रांसह कौटुंबिक पातळीवर देखील तुम्ही आम्हा सर्वांचे आदर्श आहात. तुमच्या विचारांची स्वाभिमानी मशाल घेऊन आम्ही सर्वजण आपल्यासोबत अविश्रांत चालण्याचा प्रयत्न करीत आहोत. pic.twitter.com/DgeMVg7OyD
सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. शरद पवारांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण करून दिली. "कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यान पुन्हा एकदा सीमावाद सुरु झाला असताना महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा कर्नाटकच्या तंबीनंतर रद्द करण्यात आला. ही बातमी वाचली आणि मला आदरणीय पवार साहेबांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण झाली. साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही. खुद्द एस एम जोशी देखील साहेबांच्या पाठीवर उमटलेले वळ पाहून हळहळले होते. तो काळच तसा होता" असं म्हटलं होतं.
"बेळगावात जमावबंदी होती. साहेब पूर्वीच पोहोचले असल्यामुळे अरविंद गोगटेंच्या घरी त्यांनी मुक्काम केला. आंदोलनाची वेळ झाली. बरोबर ११ वाजता राणी चेन्नमा चौकात लोक जमू लागले. अचानकपणे हजारो लोक जमल्याने पोलिस गोंधळले. संतप्त पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. साहेब, बाबासाहेब कुपेकर, आदींना पोलिसांनी बेदम मारहाण केली. साहेबांना हिडकल डॅमच्या परिसरातील विश्रामगृहावर आणण्यात आलं. तेथेही लोक जमा झाले. वयस्कर एस एम जोशी साहेबांना भेटायला गेले. त्यांनी त्यावेळी साहेबांच्या पाठीवरील पोलिसांनी मारहाण केलेले वळ पाहिले. ते पाहून एसएम हळहळले होते. हा भारावलेला काळ कुठे आणि आजचा काळ कुठे? सारंच ३६० अंशात बदललंय" असं सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"