राष्ट्रवादीचं ठरलं! मलिक यांच्याबद्दल मोठा निर्णय; 'ममता' मार्गानं करणार भाजपचा मुकाबला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 08:15 PM2022-02-23T20:15:39+5:302022-02-23T20:17:42+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसची ठाम भूमिका; ममता बॅनर्जींच्या मार्गानं करणार विरोधकांचा मुकाबला
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचलनालयानं अटक केली आहे. ईडीनं पहाटे मलिक यांना घरातून ताब्यात घेतलं. आठ तास त्यांची चौकशी झाली. त्यानंतर ईडीनं त्यांना अटक केली. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालं आहे.
अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. ईडीनं त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मलिक यांच्यावरही मंत्रिपद सोडण्याची नामुष्की ओढवणार असल्याची शक्यता निर्माण झाली. मात्र मलिक यांच्या बाबतीत पक्षानं वेगळी भूमिका घेतली आहे. पक्ष त्यांच्या पाठिशी संपूर्ण ताकदीनिशी उभा राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
नवाब मलिक यांना झालेली अटक चुकीच्या पद्धतीनं झाली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे. काँग्रेसनंदेखील मलिक यांच्याशी पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. मलिक यांनी राजीनामा देऊ नये अशी भूमिका काँग्रेसनंदेखील घेतली आहे. मंत्रालयाशेजारी असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ तिन्ही पक्षांचे मंत्री, आमदार निषेध आंदोलन करणार आहेत.
ममतांच्या मार्गानं करणार भाजपचा सामना
गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्याआधी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्यांवर आरोप झाले. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या पाठिशी ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी मंत्र्यांचे राजीनामे घेतले नाहीत. त्याचप्रमाणे मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे.
नारायण राणेंचा राजीनामा घेतला का?
मंत्र्यांना कोंडीत पकडून, त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचं काम विरोधकांकडून सुरू आहे. सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विरोधकांनी आरोप केले, अटक झाली म्हणून राजीनामा घेणार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनादेखील अटक झाली होती. त्यांनी राजीनामा दिला होता का, असा सवाल भुजबळांनी विचारला.