2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसशीच आघाडी करणार- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 11:20 AM2018-01-26T11:20:04+5:302018-01-26T11:21:52+5:30
राजकारणात कधीच कोणी निवृत्त होत नसतो, याची प्रचिती 75 वर्षीय शरद पवार नेहमीच सर्वांना करून देत असतात. एवढ्या वयातही त्यांच्यासारखा राजकारणात चाणाक्ष व्यक्ती नाही.
मुंबई- राजकारणात कधीच कोणी निवृत्त होत नसतं, याची प्रचिती 75 वर्षीय शरद पवार नेहमीच सर्वांना करून देत असतात. एवढ्या वयातही त्यांच्यासारखा राजकारणात चाणाक्ष व्यक्ती नाही. मुंबईत संविधान बचाव रॅलीच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी काँग्रेसबरोबरच्या आघाडीवर सूचक वक्तव्य केलं आहे.
आम्हाला आघाडी करायची असल्यास काँग्रेसलाच प्राधान्य देऊ, येत्या 2019च्या लोकसभा निवडणुकीत फक्त काँग्रेसशीच आघाडी करू, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. संविधान बचाव रॅलीवर पवार म्हणाले, सरकारमधील एका मंत्र्यानं मंचावरून सांगितलं की, आमचा पक्ष संविधान बदलण्यासाठीच सत्तेवर आला आहे. मात्र नंतर त्यांनी त्यांचं ते विधान मागे घेतलं. या प्रकारामुळे भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे.
देशाला वाचवण्यासाठी संविधान बचाव रॅलीची आवश्यकता आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीवरही पवारांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, आघाडी करण्यासंदर्भात मी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींसोबत दोनदा बोलणी केली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच आम्ही विदर्भात एक संयुक्त कार्यक्रमही केला होता. जर आम्ही एकत्र आलो तर सत्ताधा-यांना मजबूत पर्याय देऊ शकतो. तसेच शिवसेनेच्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचंही त्यांनी स्वागत केलं.
शिवसेना शेवटपर्यंत लोकसभा स्वबळावर लढवण्याचा भूमिकेवर ठाम राहिल्यास यात शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे. शिवसेनेकडेही लोकसभेसाठी योग्य उमेदवार आहेत. युतीत असतानाही भाजपानं त्यांच्याशी दुर्व्यवहार केला आहे. स्वबळावर लढण्याच्या निर्णयामुळे त्यांना ताकद मिळणार आहे, असे सूतोवाचही शरद पवार केले आहेत