राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या अचानक मंत्रालयावर धडकल्या; पोलिसांची तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 03:18 PM2022-11-15T15:18:35+5:302022-11-15T15:18:58+5:30
अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादीची महिला आघाडीने मंत्रालयाकडे कूच केले होते.
एकीकडे गेल्या दोन दिवसांपासून जितेंद्र आव्हाड आणि विनयभंगाच्या आरोपाच्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना आज दुपारी अचानक राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या मंत्रालयावर धडक देण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. यामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती.
अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादीची महिला आघाडीने मंत्रालयाकडे कूच केले होते. या आंदोलनाची कोणतीही पूर्वकल्पना पोलिसांना देण्यात आली नव्हती. मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी देखील झाली होती. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष कार्यालयात आज महिला पदाधिकाऱ्यांची बैठक होती.
या महिलांनी सत्तार हे अर्वाच्च भाषा वापरत असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही आणि आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला जातोय. आम्ही आमच्या भावासोबत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा राजीनामा घ्यायलाच हवा अशी मागणी कर आणि घोषणाबाजी करत या महिला कार्यकर्त्यांनी मंत्रालयाकडे चालत जाण्यास सुरुवात केली.
काही अंतर गेल्यावर पोलिसांनी अधिकची कुमक मागवून या महिला कार्यकर्त्यांना मंत्रालयाच्या अगोदरच ताब्यात घेतले. यावेळी काही महिला कार्यकर्त्या या पोलीस व्हॅनमध्ये जाण्यास तयार नव्हत्या असेही दिसले. यामुळे महिला पोलिसांना मोठी मेहनत घ्यावी लागली.