जयंत पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली, किरण काळे व जगताप समर्थकांमध्ये बाचाबाची
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 05:56 PM2019-01-22T17:56:54+5:302019-01-22T17:57:02+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ केलेले १८ नगरसेवक राष्ट्रवादी भवनमध्ये आल्याच्या कारणावरून जिल्हा युवकचे माजी अध्यक्ष किरण काळे आणि आ. संग्राम जगताप यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच जुंपली.
अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ केलेले १८ नगरसेवक राष्ट्रवादी भवनमध्ये आल्याच्या कारणावरून जिल्हा युवकचे माजी अध्यक्ष किरण काळे आणि आ. संग्राम जगताप यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच जुंपली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच हा वाद झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये दुपारी तीन वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे. या बैठकीत दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी भवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ बडतर्फ झालेले नगरसेवक बैठकीत आले. हे पाहिल्यानंतर किरण काळे यांनी त्याला आक्षेप घेतला. यावरून आ. संग्राम जगताप यांचे समर्थक आणि काळे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. बडतर्फ नगरसेवक हे आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक असल्याने ते बैठकीत आले आहेत, असे जगताप समर्थक सांगत होते. यालाही काळे यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे जोरदार वादावादी झाली. कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासमोरच एकमेकांचे उणेदुणे काढले. तेथे उपस्थित असलेले आ. अरुण जगताप यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
महापौर निवडणुकीमध्ये आ. संग्राम जगताप यांच्या आदेशावरून राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांनी भाजपला मतदान करून उघड पाठिंबा दिला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शहराध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांना पदावरून हटवित १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली होती. हे नगरसेवक आज पाटील यांना भेटून त्यांची बाजू मांडणार होते. त्यासाठीच ते राष्ट्रवादी भवनमध्ये आले होते. मात्र त्यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याने त्यांना राष्ट्रवादी भवनमध्ये प्रवेश देण्यावर किरण काळे यांनी आक्षेप घेतल्याने बैठकीच्या वेळी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.