Kangana Ranaut: कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार परत घ्या; शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी, राष्ट्रपतींना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 07:52 PM2021-11-11T19:52:00+5:302021-11-11T19:53:14+5:30

कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

ncp youth congress demands withdrawal padma shri award given to actress kangana ranaut | Kangana Ranaut: कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार परत घ्या; शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी, राष्ट्रपतींना लिहिले पत्र

Kangana Ranaut: कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार परत घ्या; शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी, राष्ट्रपतींना लिहिले पत्र

googlenewsNext

नाशिक: बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानं आनंद व्यक्त केला होता. कंगनाने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. तिने तिच्या चाहत्यांचे खूप आभारदेखील मानले. मात्र,  आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले, असे कंगनाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले. यानंतर कंगनावर टीकेची झोड उठत आहे. यातच आता कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादीसह शिवसेनेनेही अशीच मागणी केली आहे. 

कला क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे ८ नोव्हेंबर २०२१ रोजी कंगना राणावत यांचा आपल्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कला क्षेत्र वगळता कंगना रणौत या प्रत्येक क्षेत्रात नको त्या ठिकाणी आपले नाक खुपसून प्रसिद्धी झोकात राहण्याचा प्रयत्न करत असतात. याच कारणाने प्रसिद्ध सोशल मीडिया ट्विटरने कंगना रणौत यांचे अकाऊंट बंद केले होते, असे राष्ट्रवादी युथ काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा आणि योग्य ती कारवाई करावी

आता पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर कंगना रणौत यांचे पाय जमिनीवर नाहीत. सध्या त्या हवेत आहेत. त्यांनी प्रसार माध्यमांसमोर भारताचा अवमान केला आहे. १९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्वातंत्र मिळविण्याकरिता महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस यांच्यासह आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांचा अपमान झाला आहे. त्यांच्या या निंदनीय वक्तव्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे राष्ट्रपती महोदयांनी त्यांना दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा. त्यांच्यावर तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. 

बेताल वक्तव्य करणारी रणौत ही अभिनेत्री आहे

शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला असून तिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार काढून घेण्याची मागणी केली आहे. रणौत यांनी अतिशय बेजबाबदार, निराधार, स्वातंत्र्य योध्याचे अपमान करणारे हे त्याचे विधान असून त्याचा जाहीर निषेध आहे. प्रसिद्धीसाठी वरचा मजला रिकामा असलेली त्याच्यासाठी बेताल वक्तव्य करणारी रणौत ही अभिनेत्री आहे, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. 

दरम्यान, देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा मला २ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते, सैन्य दलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीला प्रमोट करण्याचे काम करते, तेव्हा मला भाजपसोबत जोडले जाते. पण, हे मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात, ते तर देशाचे मुद्दे आहेत, असे कंगनाने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. कंगनाने या मुलाखतीदरम्यान आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले, असे कंगना म्हणाली.
 

Web Title: ncp youth congress demands withdrawal padma shri award given to actress kangana ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.