रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्याआदिती तटकरे
By admin | Published: March 20, 2017 05:43 PM2017-03-20T17:43:55+5:302017-03-20T17:56:32+5:30
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली आहे.
जयंत धुळप/ऑनलाइन लोकमत
अलिबाग दि.20 - रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती सुनील तटकरे तर उपाध्यक्ष पदासाठी अॅड. आस्वाद पाटील यांची निवड, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस आघाडीच्या रविवारी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत निश्चित करण्यात आले असल्याची माहिती शे.का.पक्षाचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस अॅड. परेश देशमुख यांनी दिली आहे.
रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया गेल्या 23 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊ न पार पडली या निवडणूकीत शे.का. पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस आघाडीने स्पष्ट बहुमत मिळविले असून 21 मार्च 2017 रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या स्व.ना.ना. पाटील सभागृहात नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड होणार आहे. या पाश्र्वभूमीवर आघाडीची महत्वपूर्ण बैठक रविवारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यासमवेत पनवेल येथे कर्नाळा भवनमध्ये पार पडली असून अध्यक्षपदासाठी अदिती तटकरे व उपाध्यक्षपदासाठी अॅड. आस्वाद पाटील यांच्या नावावर सहमंती दर्शविली आहे. मंगऴवारी दि. 21 मार्च 2017 रोजी होणा:या जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी अदिती तटकरे व उपाध्यक्ष पदासाठी अॅड. आस्वाद पाटील यांची निवड निश्चित झाली आहे, असे अॅड. देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
निवडणूक बिनविरोध होणार नाही
दरम्यान मंगळवारी होणारी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही. या दोन्ही पदांकरीता आम्ही उमेदवार उभे करणार असून त्यांना विजयी करण्याच्या अनूशंगाने एका राजकीय पक्षाच्या नेत्यां बरोबर चर्चा सुरु असून निकाल मंगळवारीच कळेल,अशी माहिती शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी यांनी दिली आहे.
रायगड जि.प.पक्षीय बलाबल
रायगड जिल्हा परिषदेच्या एकुण 59 जागांपैकी शेकाप-23, राष्ट्रवादी काँग्रेस-12,काँग्रेस-03 तर शिवसेना-18 व भाजपा-3 असे पक्षीय बलाबल आहे.