MLC ELETION : कमळाच्या साथीने कोकण विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 10:33 AM2018-05-24T10:33:03+5:302018-05-24T14:08:59+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागांचा निकाल आज जाहीर झालाय.
रत्नागिरी : शिवसेनेवर नाराज असलेल्या भाजपाने केलेल्या मदतीमुळे राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळे यांना तब्बल ३१४ मतांनी पराभूत केले. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आज गुरुवारी मतमोजणी झाली. एकूण ९३८ मतांपैकी ६२0 मते राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत सुनील तटकरे यांना तर ३0६ मते शिवसेनेचे उमेदवार राजीव साबळे यांना मिळाली. १२ मते बाद झाली. ३१४ मतांच्या आघाडीने तटकरे यांनी राष्ट्रवादीची ही जागा कायम राखली.
विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपने युती केली होती. काँग्रेस, स्वाभिमान आणि शेकाप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. कागदावर युतीची मते अधिक होती. मात्र पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपासमोर उमेदवार उभा केल्यामुळे भाजपाच्या गोटात नाराजीचे वातावरण होते आणि भाजपाची मते राष्ट्रवादीला जाणार असल्याची चर्चा आधीपासूनच होती. या निवडणुकीत शिवसेनेची मते कायम राहिली असून, उर्वरित सर्वच मते राष्ट्रवादीच्या पारड्यात पडल्याचे चित्र दिसत आहे. या मतदारसंघात शिवसेनेची ३0३ मते होती तर भाजपची १६४ मते होती. मात्र प्रत्यक्षात शिवसेना उमेदवार साबळे यांना ३0६ मतेच मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची स्वत:ची मते १७४ इतकीच आहेत. उर्वरित ४४६ मते त्यांना इतरांच्या पाठिंब्यामुळे मिळाली आहेत.
काकांनंतर पुतण्या
या मतदारसंघात आधी अनिल तटकरे विजयी झाले होते. आता त्यांचा पुतण्या अनिकेत सुनील तटकरे विजयी झाले. त्यामुळे हा मतदारसंघ काकांकडून पुतण्याकडे गेला आहे.
कमळ फुलले, धनुष्यबाणाचीही साथ
राष्ट्रवादी काँग्रेसची मते ठाम राहिली. काँग्रेस, शेकाप, स्वाभिमान यांनी आपला शब्द कायम ठेवला. त्याचबरोबर काही ठिकाणी कमळ फुलले आणि काही ठिकाणी धनुष्यबाणाचीही साथ मिळाली, अशी बोलकी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.