राष्ट्रवादीला जुन्या सुभेदारांचेच आव्हान
By admin | Published: February 17, 2017 01:06 AM2017-02-17T01:06:07+5:302017-02-17T01:06:07+5:30
राष्ट्रवादीकडून विकासाचे मॉडेल म्हणून उदाहरण दिल्या जाणाऱ्या पवारांच्या पिंपरी-चिंचवड या गडालाच त्यांच्याच पक्षातील शिलेदारांच्या
विजय बाविस्कर / पिंपरी-चिंचवड
राष्ट्रवादीकडून विकासाचे मॉडेल म्हणून उदाहरण दिल्या जाणाऱ्या पवारांच्या पिंपरी-चिंचवड या गडालाच त्यांच्याच पक्षातील शिलेदारांच्या माध्यमातून सुरुंग लावण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आणि अस्तित्वाची लढाई समजून राष्ट्रवादीने लावलेली ताकद यामुळे पिंपरी- चिंचवड महापालिकेतील लढत अटीतटीची बनली आहे.
पूर्वीच्या बारामती लोकसभा मतदारसंघात या भागाचा समावेश होता. मात्र, शरद पवार यांनाही येथून तुलनेने मताधिक्य मिळत नव्हते. त्यामुळे माजी मंत्री रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडकडे लक्ष घातले. नेत्यांना ताकद दिली. मात्र, त्यातून राज्याचीच लहान आवृत्ती येथे झाली. नेत्यांचे सुभे निर्माण झाले. या सगळ्या शिलेदारांनी आपापले गड तयार केले. २०१४ च्या निवडणुकीपासून भाजपने पावले टाकून या शिलेदारांनाच आपल्याकडे खेचण्यास सुरूवात केली. त्याची सुरूवात आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यापासून झाली आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर आझमभाई पानसरे यांच्यासारख्या पवारांचा निष्ठावानही भाजपवासी झाला. याच ताकदीवर आता भाजप पिंपरी-चिंचवडचा गड काबीज करण्यासाठी निघाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी रणशिंग फुंकले आहे.
२००२ पासून राष्ट्रवादीची सत्ता आहे. पवारांचा हा गड काबीज करण्याची मुख्यमंत्र्यांनी शहरातील खासदार अमर साबळे, अॅड. सचिन पटवर्धन या जुन्या कार्यकर्त्यांना बळ देऊन आणि पवारांचे एकेकाळचे शिष्य आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे यांची मोट बांधून लक्ष्य २०१७ रणशिंग फुंकले आहे. भाजपाच्या या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये स्वत: लक्ष घातले आहे. विकासाचा मुद्दा घेऊन ते निवडणुकीत उतरले आहेत.