विषय समित्यांच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची वर्णी
By admin | Published: March 1, 2017 12:58 AM2017-03-01T00:58:08+5:302017-03-01T00:58:08+5:30
समान सदस्यसंख्या असल्यामुळे पाचव्या सदस्यासाठी चिठ्ठ्या काढाव्या लागल्या.
इंदापूर : समान सदस्यसंख्या असल्यामुळे पाचव्या सदस्यासाठी चिठ्ठ्या काढाव्या लागल्या. चिठ्ठीद्वारे नावे निघाल्याने इंदापूर नगरपरिषदेच्या तीन विषय समित्यांच्या सभापती पदांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची वर्णी लागली.
चिठ्ठीतून विषय समितीच्या सभापतीपदांची ‘लॉटरी’ लागल्याचा लाभ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला. विषय समित्याच्या सभापती व सदस्य निवडीसाठी सोमवारी सकाळी नगरपरिषदेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची विशेष बैठक घेण्यात आली होती. नगराध्यक्षा अंकिता शहा या काँग्रेसच्या असल्या तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृहातील नगरसेवकांचे संख्याबळ ९ आहे. काँग्रेसपेक्षा ते एकने जास्त आहे. नगराध्यक्षांसह काँग्रेसचे संख्याबळ ९ होते. विषय समितीवरील सभापती पदासह सदस्यांची संख्या ५ लागते. पाचव्या सदस्यासाठी चिठ्ठी काढावी लागली. पाच पैकी तीन समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाची निवड करावी लागली. महिला व बालकल्याण समितीचे उपासभापतीपदही राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले. (वार्ताहर)
>समिती व निवड झालेल्या सभापतींची नावे अशी :
पाणीपुरवठा व अर्थविभाग : अमर माणिक गाडे ( राष्ट्रवादी काँग्रेस), बांधकाम नियोजन व विकास समिती - उपनगराध्यक्ष, धनंजय विश्वासराव पाटील (काँग्रेस), आरोग्य, स्वच्छता, शेती, उद्यान - स्वप्निल राऊत (राष्ट्रवादी काँग्रेस), वीज व वृक्षसंवर्धन - रजिया हजरत शेख (काँग्रेस), महिला विकास व बालकल्याण - हेमलता वसंत माळुंजकर, उपसभापती उषा श्रीकांत स्वामी (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)