राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवकांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2016 03:57 AM2016-12-22T03:57:59+5:302016-12-22T03:57:59+5:30

कळवा खाडीकिनाऱ्यालगतची बांधकामे तोडण्याचा ठराव महासभेत झाला, तो अतिशय चुकीचा असून, त्याविरोधात कळव्यातील

NCP's eight corporators resign | राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवकांचे राजीनामे

राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवकांचे राजीनामे

Next

ठाणे : कळवा खाडीकिनाऱ्यालगतची बांधकामे तोडण्याचा ठराव महासभेत झाला, तो अतिशय चुकीचा असून, त्याविरोधात कळव्यातील राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवकांनी राजीनामा दिल्याची माहिती कळवा, मुंब्य्राचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी झोपडपट्टीत राहणाऱ्यांच्या बाजूने या पूर्वी होती आणि यापुढेदेखील आमची भूमिका तीच असेल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. जर प्रशासनाची अशा प्रकारे कारवाईचा बुलडोझर फिरवून सुंदर स्मशान करायची भूमिका असेल, तर त्या सुंदर स्मशानात आमची प्रेते जळली, तरी एकाही बांधकामावर हातोडा पडू देणार नसल्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.
राजीनामा देणाऱ्यांमध्ये मिलिंद पाटील, मनोहर साळवी, महेश साळवी, मनाली पाटील, अपर्णा साळवी, मनीषा साळवी, अक्षय ठाकूर, रीटा यादव या आठ नगरसेवकांचा समावेश असून, गुरुवारी मुकुंद केणी आणि प्रमिला केणी हेदेखील राजीनामे देणार आहेत. मागील कित्येक वर्षांपासून कळवा खाडीकिनाऱ्यावर लोक आपले वास्तव्य करून राहत आहेत, परंतु अशा प्रकारे विधान परिषदेची स्थगिती असतानादेखील महासभेत हा ठराव होतोच कसा, याचे आश्चर्य वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाने तब्बल २० हजार रहिवाशांना बेघर करण्याचा घाट घातला आहे, परंतु सुमारे २० वर्षांपासून या परिसरात राहत असलेल्या रहिवाशांना विस्थापित करून, तेथे पर्यावरणाच्या नावाखाली सुंदर स्मशान बांधण्याचा घाट घालण्यात आला आहे.
प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा हा डाव आम्ही हाणून पाडणार आहोत. त्यासाठी प्रसंगी आमची प्रेते जळली तरी हरकत नसल्याचा संतप्त इशारा आमदार आव्हाड यांनी दिला.
चार वर्षांपूर्वीदेखील अशाच प्रकारे वागळे इस्टेट येथील बांधकामांवर राज्य शासनाने कारवाईचे आदेश दिले होते. त्या वेळेस राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीनंतरही कारवाई रोखण्याचे आश्वासन दिले होते.
आतादेखील पालकमंत्री एकनाथ शिंदे त्याच भूमिकेने या बांधकामधारकांच्या बाजूने उभे राहतील, असा विश्वास आव्हाडांनी या वेळी व्यक्त केला. नागरिकांच्या हितासाठी पालकमंत्र्यांची भेट घेऊन यावर तोडगा काढू, असेही त्यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: NCP's eight corporators resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.