राष्ट्रवादीला काँग्रेसचे चोख उत्तर
By admin | Published: January 20, 2017 04:19 AM2017-01-20T04:19:40+5:302017-01-20T04:19:40+5:30
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडीची बोलणी सुरू
पंकज रोडेकर,
ठाणे- महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडीची बोलणी सुरू असून अद्यापही कळवा, मुंब्य्राच्या मुद्यावरून आघाडीचे घोडे अडले आहे. त्यामुळे हा मुद्दा लक्षात घेऊन काँग्रेसला शह देण्यासाठी राष्ट्रवादीने सर्वच जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर आता काँग्रेसनेदेखील सावध पवित्रा घेऊन राष्ट्रवादीला तिष्ठत ठेवून सर्व जागांसाठी मुलाखती घेण्याचे निश्चित केले आहे. परंतु, या मुलाखतींच्या कार्यक्रमाची तारीख त्यांनी अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आघाडीचे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठाणे महापालिका निवडणूक आघाडी करून लढवण्याची तयारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केली असून त्यानुसार आता दुसऱ्या टप्प्यातील बोलणी पुढे सरकली आहे. येत्या २१ जानेवारीला मुंबईत आघाडीचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. परंतु, असे असले तरीदेखील कळवा, मुंब्य्राच्या मुद्यावरून आघाडीत यापूर्वीच बिब्बा पडला आहे. राष्ट्रवादी कळवा, मुंब्य्राबाबत आग्रही असून काँग्रेसदेखील कळवा, मुंब्रा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे वेळ पडल्यास राष्ट्रवादीशी कट्टी घेऊन सपाबरोबर घरोबा करण्याची तयारीदेखील काँग्रेसने केली आहे.
महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत लोकशाही आघाडी होऊनही सत्तेपासून त्यांना लांब राहावे लागले. हीच सल भरून काढण्यासाठी २०१७ च्या निवडणुकीत आघाडी करून सत्ताधाऱ्यांचे मनसुबे उधळून लावण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून सुरू आहे. त्यानुसार, पहिल्या बैठकीपासून दोन्ही काँग्रेसने आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादीच्या गळाला मुंब्य्रात काँग्रेसचे काही मासे लागले. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद या पट्ट्यात आणखी वाढली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने कळवा-मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव पुढे आणला आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांच्या ठाण्यात आलेल्या वरिष्ठ नेत्यांनी आघाडीला हिरवा कंदील दाखवला आहे. परंतु, असे असले तरी कळवा, मुंब्य्राचे कोडे अद्यापही सुटलेले नाही.
काँग्रेसनेही दगाफटका होऊ नये, म्हणून सावध पवित्रा घेऊन सर्वच प्रभागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या मुलाखतींच्या तारखा अद्याप निश्चित नसल्या तरी २१ जानेवारीनंतर आघाडीची काय बोलणी होते, त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.