मुख्यमंत्र्यांविरोधात राष्ट्रवादीची आघाडी
By admin | Published: June 16, 2014 03:33 AM2014-06-16T03:33:44+5:302014-06-16T03:33:44+5:30
एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अशी आघाडी उघडण्याचे संकेत देतानाच दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात काँग्रेसकडून अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादीने दबाव वाढवला आहे.
मुंबई : राज्यात अनेक महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांच्या संथ कारभारामुळे अडले असून ही स्थिती बदलली नाही, तर विधानसभा निवडणुकीत आघाडीला त्याचा फटका बसेल, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काँग्रेस श्रेष्ठींच्या कानावर घातली जाणार आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अशी आघाडी उघडण्याचे संकेत देतानाच दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात काँग्रेसकडून अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादीने दबाव वाढवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वरिष्ठ नेत्यांची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार
यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी झालेल्या या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, अजित पवार, पक्षाचे बहुतेक मंत्री आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने राज्य सरकारकडे प्रलंबित असलेले विषय आणि विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आघाडीतील जागावाटपाचे सूत्र यांची चर्चा झाली. (विशेष प्रतिनिधी)