घोटाळे झाकून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची भाजपाशी हातमिळवणी - पृथ्वीराज चव्हाण

By admin | Published: July 23, 2016 08:33 PM2016-07-23T20:33:24+5:302016-07-23T20:33:24+5:30

विधान परिषदेच्या सातारा-सांगली मतदार संघाची निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे

NCP's joining BJP to cover scams - Prithviraj Chavan | घोटाळे झाकून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची भाजपाशी हातमिळवणी - पृथ्वीराज चव्हाण

घोटाळे झाकून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची भाजपाशी हातमिळवणी - पृथ्वीराज चव्हाण

Next
>ऑनलाइन लोकमत - 
सातारा, दि. 23 - ‘विधान परिषदेच्या सातारा-सांगली मतदार संघाची निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. या दोन्ही जिल्ह्यांमधून काँग्रेसचा प्रामाणिक उमेदवार आम्ही निवडणुकीसाठी उभा करून निवडून आणू,’ अशी घोषणा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित केलेल्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत केली. सध्या, राष्ट्रवादीचे प्रभाकर घार्गे या मतदारसंघाचे आमदार असून येत्या काही महिन्यांत याची निवडणूक होणार आहे.
 
ते पुढे म्हणाले की ‘राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दोनवेळा काँग्रेसचं सरकार मुदतीआधी अल्पमतात आणलं. मोदींचं सरकार राज्यात येण्याचा श्रीगणेशाही त्यांनीच केला. आपले सर्व घोटाळे झाकून राहण्यासाठी त्यांनी भाजपलाच फायदा देण्याचं ठरवलेलं आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीसोबत कुठल्याही परिस्थितीत राहायचं नाही, असं मी काँग्रेस श्रेष्ठींना ठणकावून सांगितलं होतं; पण कुठे पाल चुकचुकली माहीत नाही; पण नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने एक जागा राष्ट्रवादीला देऊन टाकली. रामराजे बिनविरोध निवडून येऊन सभापती झाले. मी लढायचा आग्रह त्यांच्याशी असलेल्या व्यक्तिद्वेषातून नव्हता केला. तर मागील इतिहास लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीत हात मिळवणी न करता लढलो असतो. तर ते काँग्रेसच्या फायद्याचं ठरलं असतं, असं माझं मत होतं. राष्ट्रवादीला दोन जागा देण्याच्या निर्णयाबाबत मी श्रेष्ठींसमोर नाराजीही व्यक्त केली. ही फार मोठी चूक काँग्रेसने केली. आता इथून पुढच्या काळात ती होऊ देणार नाही,’ 
 
‘काँग्रेस संपविण्याची भाषा वापरणा-यांना व स्वत:चे घोटाळे झाकून ठेवण्यासाठी जातीयवादी पक्षांशी हात मिळवणी करणा-यांना धडा शिकविण्याची संधी आता सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आमच्याकडे आली आहे. या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढेल. या निवडणुकीचा फायदा आपोआप त्यानंतर होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस निश्चितपणे करून घेईल. आगामी निवडणुकांमध्ये आता काँग्रेस तलवार म्यान करणार नाही. जुन्या चेह-यांचा लोकांना कंटाळा आलाय, त्यामुळे नव्या दमाचे इच्छुक उमेदवार शोधून काढा.' असेही ते म्हणाले. 
 

Web Title: NCP's joining BJP to cover scams - Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.