शरद पवारांवरील टीकेवरुन शिवसेना - राष्ट्रवादीचा 'सामना'
By admin | Published: June 11, 2014 06:12 PM2014-06-11T18:12:54+5:302014-06-11T18:13:13+5:30
सामनातील अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामनाच्या प्रभादेवी येथील कार्यालयावर धडक देत निदर्शने केली.
Next
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १२- शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केल्याचे पडसाद सामनाच्या कार्यालयावर उमटले. संतप्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामनाच्या प्रभादेवी येथील कार्यालयावर धडक देत निदर्शने केली. यादरम्यान शिवसेनेचेही कार्यकर्ते तिथे पोहोचले व काही वेळेसाठी वातावरण तणावपूर्ण बनले होते.
फेसबुकवरील आक्षेपार्ह प्रकरणात पुण्यातील मोहसिन शेख या तरुणाची हत्या झाली होती. या प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. दिल्लीत सत्ताबदल होताच एका विशिष्ट समुदायावर हल्ले वाढू लागल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. शरद पवारांच्या या विधानाचा बुधवारी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून चांगलाच समाचार घेतला होता. महाराष्ट्रातील दारूण पराभवानंतर शरद पवारांचा ताळतंत्र सुटला असून ते पाकिस्तानच्या हाफीज सईदप्रमाणे काहीही बरळू लागले आहेत, अशी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी पवारांवर केली होती. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी संध्याकाळी सामनाच्या कार्यालयावर धडक दिली. कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याची माहिती मिळताच शिवसेनेचे कार्यकर्तेही तिथे पोहोचले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. पोलिसांनी सामनाच्या कार्यालयाजवळ रॅपिड अॅक्शन फोर्सची तुकडी तैनात केली आहे.