निवडणुकीकडे राष्ट्रवादीच्या वरिष्ठांचे दुर्लक्ष !
By admin | Published: April 4, 2015 04:18 AM2015-04-04T04:18:09+5:302015-04-04T04:18:09+5:30
महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरूझाली असल्याने विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी औरंगाबादेत यानिमित्ताने दौरे सुरू केले आहेत.
औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरूझाली असल्याने विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी औरंगाबादेत यानिमित्ताने दौरे सुरू केले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पालिकेच्या निवडणुकीकडे दुर्लक्ष केले आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही चिंताग्रस्त आहेत.
विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तसा फारसा टिकाव लागला नाही. दोन्ही पक्षांचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला. महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विविध पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसेना-भाजपाने कार्यकर्त्यांचे मोठे मेळावे घेतले. त्याशिवाय त्यांचे संपर्कप्रमुख, वरिष्ठ नेते सरकारमध्ये असलेले मंत्री महापालिका निवडणुकीची व्यूहरचना करत आहेत.
भाजपाने तर प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्याकडेच सर्व सूत्रे सोपविली आहे. काँग्रेस पक्षानेही मरगळ झटकून जिल्ह्यातील आमदार, माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची समिती तयार केली आहे. एमआयएमची व्यूहरचना हैदराबादहून आलेले पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते करीत आहेत. या सर्व बाबींचा विचार केला तर राज्यात चार क्रमांकावर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळत्या महापालिका सभागृहात ११ नगरसेवक होते. त्यापैकी निवडणुकीआधी काही जणांनी एमआयएम, भाजपा आणि काँग्रेसचा रस्ता पकडला आहे. यामुळे पक्ष कात्रीत सापडला आहे. त्यामुळे महापालिकेत नगरसेवकांची दोन आकडी संख्या गाठणे हेदेखील पक्षापुढे मोठे आव्हान आहे. पक्षाची ही परिस्थिती असताना कोणताही बडा नेता अद्याप या ठिकाणी फिरकलेला नाही. पक्षाच्या जिल्ह्यातील दोन आमदारांनीही या निवडणुकीत रस दाखविलेला नाही. त्यामुळे शहर पदाधिकाऱ्यांच्या भरवशावर निवडणुका चालल्या असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)