राष्ट्रवादीची कोंडी, पैशाचा स्त्रोत सांगायचा की कर भरायचा ?
By admin | Published: May 12, 2014 03:55 AM2014-05-12T03:55:50+5:302014-05-12T03:55:50+5:30
राष्ट्रवादीच्या बँक खात्यात वर्षभरात तब्बल ३५ कोटीहून अधिकची रोकड जमा केली आहे. या पैशाचा स्रोत सांगावा किंवा रकमेवरील कर भरावा अशाा कात्रीत राष्ट्रवादी अडकली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक आॅफ महाराष्ट्रातील एका खात्यात गेल्या वर्षभरात ३५ कोटीहून अधिकची रोकड जमा झाल्याचे आयकर विभागाच्या निदर्शनास आले. वर्षभरात अनेक वेळा एक लाखापासून अडीच लाखांपर्यंतची रोख रोक्कम या खात्यात जमा करण्यात आली. तर, तब्बल १३ वेळा एक कोटीहून अधिकची रोख रक्कम या खात्यात भरण्यात आली. नियमानुसार २० हजार रुपयाहून अधिकचा निधी देणा-या देणगीदाराचा तपशील सादर करणे राजकीय पक्षांना बंधनकारक आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या खात्यात कोट्यवधीची रोकड जमा करणा-याचा तपशीलच दिलेला नाही. त्यामुळे १७ एप्रिल रोजी आयकर विभागाने नोटीस बजावत या रोख रखमेचा नेमका स्त्रोत उघड करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय एका विशिष्ट खात्यातूनच पक्षाच्या खात्यात वेळोवेळी मोठ्या रकमेचे धनादेश जमा केले जात असल्याचेही उघड झाले आहे. आयकर विभागाने या सर्व बाबींचा खुलासा मागविला आहे. (प्रतिनिधी) कुपनच्या माध्यमातून निधी यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यास पक्षातील पदाधिका-यांनी असमर्थता व्यक्त केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने निधी उभारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात १०००, ५०० आणि १०० रुपयांचे कुपन वितरीत केले होते. या कुपनच्या माध्यमातून जमा झालेला निधी एकत्रितपणे बँकेत जमा करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली.