घरगुती गॅस, इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आज आणि उद्या राज्यभर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 11:46 AM2021-07-02T11:46:14+5:302021-07-02T11:47:29+5:30
jayant patil : जगावं की मरावं या प्रश्नावर आता 'मन की बात'चं उत्तर दिसतंय की सर्वसामान्य माणसाने मरावंच, असे म्हणत जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई : केंद्र सरकारने वाढवलेल्या घरगुती गॅस, इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज व उद्या राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. आज महागाई आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य गांजला आहे. त्यात आता घरातल्या गृहिणीचंही बजेट नरेंद्र मोदींच्या भाजपाशासित केंद्र सरकारने कोलमडवले आहे. ज्यावर सर्वसामान्य माणसाच्या घरातला स्वंयपाक होतो तो एलपीजी गॅस सिलिंडरचा दर अचानक २५ रुपयांनी वाढवला आहे. जगावं की मरावं या प्रश्नावर आता 'मन की बात'चं उत्तर दिसतंय की सर्वसामान्य माणसाने मरावंच, असे म्हणत जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबईत आता घरगुती गॅस सिंलिंडरची किंमत वाढून ८०९ रुपये झाली आहे. सर्वसामान्य कुटुंबाला साधारणतः २० दिवसच एक सिलिंडर पुरते. त्यामुळे ज्याचं मासिक उत्पन्न कसंबसं सहा ते १० हजार रुपयांच्या आसपास आहे त्या देशातल्या सर्वसामान्यांच्या घराचा इंधनाचा खर्च मोदींनी दीड हजार रुपयांचा करून ठेवला आहे. आज इंधन दरवाढीवर ताशेरे ओढूनही मोदी सरकार ढिम्म हलायला तयार नाही. पेट्रोल शंभरीपार गेले, तेव्हा लोकांनी त्यावर विनोद केले. सोशल मीडियावर मिम्स झाले. पण केंद्र सरकारने काहीच उपाययोजना केली नाही. केवळ निवडणुकीपुरतंच गिमिक करायचं त्या त्या राज्यात निवडणुका लागल्या की इंधर दरवाढ नियंत्रित करायची आणि निवडणुका संपल्या की आपल्या आश्वासनांचा विसर पडत सर्वसामान्य माणसांना वाऱ्यावर सोडायचं हा भाजपाचा खाक्या, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
१०६ रुपयांच्या पुढे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर गेले. डिझेलही शंभरचा पल्ला गाठत आहे. त्यात आता स्वैपाकाचा गॅसही वाढला. पेट्रोलच्या सेंच्युरीच्या विनोदाचे केंद्र सरकारला फारसे वावडे उरलेले नाही. त्यांची कातडी निबर झाली आहे. मात्र सर्वसामान्य माणसाच्या तोंडचं अनही आता मोदीजी हिरावून घेऊ पाहात आहेत. हेच का त्यांचे अच्छे दिन असे म्हणत आज केंद्रात सत्ता असलेले भाजपाचे लोक एकेकाळी इंधन दरवाढीवरून आकाश पाताळ एक करायचे. सरकारच्या नावाने खडे फोडायचे. आता त्या कालखंडाच्या दुप्पट-तिप्पट इंधनाचे दर झालेत. परंतु केंद्र सरकार दरांचं नियमन करायला तयार नाही. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य माणसांचं कंबरडं मोडलं तरी चालेल अशी या मोदी सरकारची भूमिका आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
इंधन दरवाढीचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य माणसाला बसतो. सध्या गेल्या दीड वर्षांतल्या कोविड प्रादुर्भावाच्या कालखंडामध्ये अनेकांचे रोजगार गेले आहेत, ज्यांचे रोजगार आहेत त्याच्या मिळकतीमध्ये कपात झाली आहे. त्यामुळे आपला खर्च कसा मिळवायचा याचा एक ही समस्या लोकांसमोर आहे. अशा कालखंडात केंद्र सरकार मात्र मूग गिळून बसले आहे. त्यांना कुठलीच संवेदनशीलता राहिलेली नाही. पण आपण आता गप्प बसून चालणार नाही. तुमचा सिलिंडर आमच्या घराच्या सुख-शांतीला आग लावत असेल तर आंदोलन छेडण्याशिवाय तुम्ही आमच्यासमोर पर्यायच ठेवला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कोविड निर्बंधाचे सगळे विहित नियम पाळून उद्या व परवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्याच्या ठिकाणी या इंधन दरवाढीविरोधात आंदोलन छेडणार आहेत, असे जयंत पाटील जाहीर केले आहे.