गोव्यात नदयांच्या राष्ट्रीयीकरणास राष्ट्रवादी काँग्रेसचाही तीव्र विरोध
By admin | Published: September 30, 2016 06:45 PM2016-09-30T18:45:57+5:302016-09-30T18:45:57+5:30
राज्यातील नद्यांच्या राष्ट्रीयीकरणास राष्ट्रवादी काँग्रेसनेही विरोध दर्शविला असून या प्रश्नावर गोवा फॉरवर्डबरोबर राहू, असे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी जाहीर केले आहे.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ३० : राज्यातील नद्यांच्या राष्ट्रीयीकरणास राष्ट्रवादी काँग्रेसनेही विरोध दर्शविला असून या प्रश्नावर गोवा फॉरवर्डबरोबर राहू, असे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी जाहीर केले आहे. या प्रकरणी केंद्रीय जहाजोद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला.
पत्रकार परिषदेत डिसोझा म्हणाले की, यामुळे मच्छिमार संकटात येतील तसेच अंतर्गत जलवाहतुकीवरही निर्बंध येतील. १८२ किलोमिटरचा नदी किनारी तटही केंद्र सरकारच्या अखत्यारित जाईल. मुरगांव पोर्ट ट्रस्टने आधीच बेतुल ते काणकोणपर्यंत सागरी कब्जा केला आहे. वास्कोत तर किनाऱ्यावर कोणतेही काम करायचे झाल्यास एमपीटीची परवानगी आधी घ्यावी लागते. अनेकदा एमपीटी आडमुठे धोरण घेते. आता तर राज्यातील सहा नद्या एमपीटीच्या ताब्यात जातील त्यामुळे लोकांना त्याचा बराच त्रास होणार आहे.
गोवा फॉरवर्डने या प्रश्नावर समविचारी पक्षाने एका व्यासपीठावर येण्याची जी हाक दिली आहे त्यास राष्ट्रवादीने प्रतिसाद दिला असून आंदोलन उभरायचे झाल्यासही पक्ष गोवा फॉरवर्डबरोबर असेल, असे डिसोझा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, दुरुस्ती विधेयक आणून सरकारने माड कापण्यासाठी मार्ग मोकळा केला, जमिनीही लाटल्या आता नद्याही आंदण द्यायला निघाले आहे. एमपीटीने मुरगांव बंदरात कोणतेही परवाने न घेता गाळ उपसण्याचे काम हाती घेतले तेव्हा राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेऊन स्थगिती आणावी लागली. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाबाबत सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेणार असे आश्वासन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभेत दिले होते ते पाळलेले नाही. नद्यांचे राष्ट्रीयीकरण करुन खाजगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.
नितीन गडकरींवर आरोप
दरम्यान, पक्षाचे सरचिटणीस अविनाश भोसले यांनी केंद्रीय जहाजोद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्यावर हल्लाबोल करताना हे ह्यआर्थिक राजकारणह्ण असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात उड्डाणपुलांच्या बाबतीत भ्रष्टाचार केल्याचा संशय असलेलेच आता गोव्यात स्वार्थासाठी नद्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यास पुढे सरसावले आहेत, असे भोसले म्हणाले. गोमंतकीय जनतेला विश्वासात न घेताच हा घाट घालण्यात आला, अशी टीका त्यानी केली.
पत्रकार परिषदेस देवानंद नाईक, अभिजित धारगळकर, जॉर्ज बार्रेटो आदी पदाधिकारीही उपस्थित होते.