राष्ट्रवादीची खेळी ठरली यशस्वी
By Admin | Published: February 27, 2017 01:07 AM2017-02-27T01:07:15+5:302017-02-27T01:07:15+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तालुक्यात विरोध संपवायचा प्रयत्न केला, त्यात यश आले.
सोमेश्वरनगर : काकडे घराण्याला जवळ करून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तालुक्यात विरोध संपवायचा प्रयत्न केला, त्यात यश आले. आतापर्यंत पवार यांनी काकडे कुटुंबातील प्रभावी व्यक्तींना बरोबर घेऊन राजकारण केले. आता प्रमोद काकडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देत विरोध संपवला. काकडे हे १२ हजार ७६७ अशा विक्रमी मतांनी निवडून आले. त्यामुळे राष्ट्रवादीला फायदाच झाला.
मागील दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात असलेले प्रमोद काकडे यांनी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सतीश काकडे यांच्या पॅनेलमधून राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढविली होती. मात्र, त्या वेळी शेतकरी कृती समितीला पराभवाला सामोरे जावे लागले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागण्यापूर्वीच प्रमोद काकडे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अशी चर्चा होती. त्याप्रमाणेच निवडणुकीच्या काही दिवस आधी प्रमोद काकडे यांनी मुंबईत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. पक्षाने त्यांची उमेदवारी निश्चित केली. हे करत असताना अजित पवार यांनी गेली अनेक दशकांचे पवार आणि काकडे घराण्यामधील राजकीय वैमनस्य संपविले. त्याचबरोबर मागील निवडणुकीत हा गट आणि गणाच्या दोन्ही जागा काकडे यांनी जिंकल्या होत्या. दरम्यान, प्रमोद काकडे हे गावकी आणि भावकीला विश्वासात घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यामुळे शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनादेखील नमते घ्यावे लागले. ज्यांच्या बरोबरीने पवारांच्या विरोधात आंदोलन उभे केले. त्यांच्याच विरोधात सतीश काकडे यांना प्रचार करावा लागला. दिलीप खैरे, चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांच्या जिल्हा परिषद गटांमध्ये त्यांनी राष्ट्रवादीसाठी प्रचार केला. त्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला. कालचा विरोधक ते आजचा समर्थक, अशी भूमिका सतीश काकडे यांना पार पाडावी लागली. त्यांनी तातडीने प्रमोद काकडे यांना पाठींबा जाहीर केला होता. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने उमेदवारी मागितलेल्या बारा इच्छुक उमेदवारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. इच्छुक असलेल्या बारा उमेदवारांनापैकी धैर्यशील काकडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीमुळे प्रमोद काकडे यांच्या मतांना फटका बसेल, असे बोलले जात असताना याचा राष्ट्रवादीच्या मतदानावर फारसा फरक पडल्याचे दिसले नाही. धैर्यशील काकडे यांना केवळ ८९५ मते मिळाली, तर भाजपाचे इंद्रजित भोसले यांना युवा वर्गाचा जास्त पाठींबा असल्याचे चित्र दिसले. परंतु, त्यांना ५ हजार ३२२ मते मिळविण्यात यश आले. या व्यतिरिक्त काँग्रेसचे तानाजी गायकवाड यांना ११६९, तर दुसरे अपक्ष उमेदवार शरद भेलके यांना ११३१ मतांवर समाधान मानावे लागले. प्रमोद काकडे यांना २७ हजार २५७ मतांपैकी १८ हजार ८९ मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा १२ हजार ७६७ एवढ्या विक्रमी मतांनी काकडे निवडून आले.
निंबूत पंचायत समिती गणामध्ये एका जागेसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. यामध्ये राष्ट्रवादीच्या नीता फरांदे यांनी ९०३० मते मिळविली. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या मोनिका महानवर यांना २६६८, तर शिवसेनेच्या वंदना शिंदे यांना ७५० मते मिळाली. करंजेपूल गणामध्ये एका जागेसाठी तीन उमेदवार उभे होेते. यामध्ये राष्ट्रवादीच्या मेनका मगर यांनी ८७८९ एवढे मताधिक्य घेतले. भाजपाच्या उज्ज्वला सोरटे यांना ४७८३ मते मिळाली, तर शिवसेनेच्या नलिनी गायकवाड यांना ४९१ मते मिळाली. काकडेंना बरोबर घेतल्याने राष्ट्रवादीला दुहेरी फायदा झाला. एकीकडे परंपरागत विरोधक संपवला, तर दुसरीकडे विरोधकांसाठी त्यांचाच वापर केला.