राष्ट्रवादी काँग्रेसचा एसटी बस कर्मचा-यांच्या संपाला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 01:39 PM2017-10-20T13:39:59+5:302017-10-20T13:40:09+5:30
सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार संघटनेनं काम बंद आंदोलन छेडलं आहे. 4 दिवसांपासून कर्मचारी संपावर गेलेले आहेत.
कल्याण - सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार संघटनेनं काम बंद आंदोलन छेडलं आहे. 4 दिवसांपासून कर्मचारी संपावर गेलेले आहेत. ST प्रशासन आणि सरकारतर्फे प्रचंड संपकरी कामगारांना त्रास देण्यात येत आहे आणि दडपशाही करण्यात येत आहे, असा आरोप करण्यात येत आहे.
विश्रामगृह तसंच पिण्याचे पाणीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातील ST डेपोंमध्ये बंद करण्यात आले आहे. जेणेकरुन कामगार वर्ग दबून जाईल. ST डेपो परिसरात 200 मीटरपर्यंत खासगी वाहनांना परवानगी न देण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय असतानादेखील खासगी वाहनांना बस डेपोत परवानगी देऊन ST प्रशासनाने हायकोर्टाचा अवमान केला आहे, असे आंदोलनकर्त्या कर्मचा-यांचं म्हणणे आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण पश्चिम विधानसभा कमिटीतर्फे ST कर्मचा-यांच्या संपास पाठिंबा देण्याची भूमिका आज घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई आणि माजी नगरसेवक उमेश बोरगांवकर यांनी आज कल्याण बस डेपोमधील कामगारांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला तसेच ST प्रशासनाशी चर्चा करून कामगारांच्या मागण्या त्वरीत मान्य करण्याची विनंती केली.
यावेळी ST कामगार युनियन तर्फे कोकाटे दादा, म्हस्के भाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दशरथ पाटील, उल्केश पवार, सुभाष गायकवाड, विद्याधर मदन, प्रविण मुसळे, वेंधे सर, खाडे सर, सुधीर भोईर तसेच इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.