नेत्यांना सोलापूरात आणण्यात राष्ट्रवादीची दमछाक
By admin | Published: February 16, 2017 08:11 PM2017-02-16T20:11:45+5:302017-02-16T20:11:45+5:30
नेत्यांना सोलापूरात आणण्यात राष्ट्रवादीची दमछाक
नेत्यांना सोलापूरात आणण्यात राष्ट्रवादीची दमछाक
सोलापूर : आॅनलाईन लोकमत
एकीकडे प्रचारासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिलेले असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना सोलापुरातील प्रचारासाठी वेळ मिळेना. या नेतेमंडळींच्या मागे लागून त्यांना आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतेमंडळींची मात्र दमछाक होत आहे. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येण्याचे आश्वासन दिल्याने तूर्त तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. अन्य नेत्यांना येथे आणण्यासाठी स्थानिक नेत्यांचे प्रयत्न मात्र सुरूच आहेत. दरम्यान, उद्या (मंगळवारी) सकाळी ११ वाजता शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार असल्याचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आदेशानंतरही सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची शेवटी बिघाडीच झाली. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील चित्र विचित्र झाले आहे. काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. शिवाय काँग्रेसच्या काही नेतेमंडळींनी प्रचारासाठी हजेरी लावली. परंतु राष्ट्रवादीचा एकही नेता अद्याप प्रचारासाठी न आल्याने पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. पक्षाचे शहराध्यक्ष भारत जाधव हे शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, नवाब मलिक यांच्या संपर्कात आहेत. त्यापैकी एक जणही प्रचारासाठी तारीख देईना. नवाब मलिक यांच्याशी भारत जाधव यांनी संपर्क साधला असता त्यांनी आपल्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी असल्याचे सांगून सोलापुरातील प्रचार सभेसाठी न येण्याचे स्पष्ट केले. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत़ अशा परिस्थितीत कोणाला आणायचे ? हा प्रश्न पदाधिकाऱ्यांना पडला आहे.