प्रा. एन. डी. पाटील यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 05:57 AM2022-01-19T05:57:57+5:302022-01-19T05:58:15+5:30
कसबा बावडा येथील स्मशानभूमीत ‘लाल सलाम’च्या जयघोषात चळवळीतील शिलेदारांच्या साक्षीने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
कोल्हापूर : आयुष्यभर विज्ञानवादी क्रांतिकारी विचारांसोबत जगलेले प्रा. एन. डी. पाटील यांच्या रूपाने चळवळीचा आधारवड मंगळवारी कायमचा विसावला. कसबा बावडा येथील स्मशानभूमीत ‘लाल सलाम’च्या जयघोषात चळवळीतील शिलेदारांच्या साक्षीने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
दुपारी एकच्या सुमारास पार्थिव रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे मार्गस्थ झाले. कोल्हापूर पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून अखेरची मानवंदना दिल्यानंतर दहन करण्यात आले. मुलगा सुहास व प्रशांत यांनी चितेला भडाग्नी दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाटील कुटुंबीय उपस्थित होते.
तत्पूर्वी सकाळपासूनच त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी शाहू कॉलेजच्या पटांगणावर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आदींनी अंत्यदर्शन घेतले.