एनडीएचा शिस्तबद्ध दिमाखदार दीक्षांत सोहळा
By admin | Published: May 31, 2017 02:39 AM2017-05-31T02:39:02+5:302017-05-31T02:39:02+5:30
तीन वर्षांचे यशस्वीपणे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण... देशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण... आणि येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्याचा त्यांच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तीन वर्षांचे यशस्वीपणे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण... देशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण... आणि येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्याचा त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास... अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३२ वा शिस्तबद्ध दीक्षांत सोहळा मंगळवारी खेत्रपाल परेड ग्राऊंडवर दिमाखात पार पडला. विद्यार्थ्यांना मानवंदना देण्यासाठी वरुणराजानेही या वेळी हजेरी लावली होती. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
या वेळी अधिकारी व उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी सुखोई लढाऊ विमानांनी अधिकारी आणि उपस्थितांना दिलेली सलामी विशेष आकर्षण ठरले.
भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लांबा यांनी दीक्षांत संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. या वेळी एनडीएचे कमांडंट एअरमार्शल जसजितसिंग क्लेर, लष्कराच्या दक्षिण कमानचे प्रमुख लेप्टनंट जनरल पी. एम हारीस, डेप्युटी कमांडंट रिअर अॅडमिरल एस. के. ग्रेवाल, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश शुक्ला, तसेच लष्करातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
संचलनात एकूण ३१३ कॅडेट सहभागी झाले होते. यातील २११ छात्र लष्कराचे, ३४ छात्र नौदलाचे आणि ६७ छात्र हवाईदलातील होते. याशिवाय ११ विदेशी छात्रांचाही समावेश होता. यात अफगाणिस्तानचे २, भूतानचे २, किरगीजस्तान, लेसोथो, नायजेरिया, रवांडा या देशांचे प्रत्येकी १ व कझाकिस्तानचे ३ छात्र सहभागी होते. या वेळी व्ही. एस. सैनी या विद्यार्थ्याला राष्ट्रपती सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. सन्यम द्विवेदी याला रौप्यपदकाने आकाश के. आर. याला कांस्यपदकाने गौरवण्यात आले. यावर्षी ‘द चीफ आॅफ स्टाफ बॅनर’ चॅम्पियन किताब क्यू स्क्वाड्रनने पटकाविला.
या वेळी लांबा म्हणाले, देशातील सर्वात नोबल प्रोफेशनमध्ये तुम्ही आला आहात. तुमच्या खांद्यावरील तारे तुमच्या कार्याची जाणीव तुम्हाला देत राहतील. तीन वर्षांत तुम्ही घेतलेल्या प्रशिक्षणामुळे साहस, नेतृत्वगुण आणि मूल्ये तुम्ही शिकला आहात. तुम्ही मिळवलेले प्रावीण्य भविष्यात प्रत्येक आघाडीवर तुम्हाला सक्षम आणि यशस्वी बनवेल. या पदवीप्रदान सोहळ्यात शानदार संचलनाबरोबर चित्तथरारक कवायतीही सादर करण्यात आल्या.
आघाडीवर काम करायचे आहे : व्ही. एस. सैनी
लष्करातील पायदल हे आघाडीवर लढत असते. मला आघाडीवर
लढायचे असून माझी पुढची
वाटचाल ही पायदलासाठी
असेल, असे मत राष्ट्रपती सुवर्णपदकविजेता व्ही. एस. सैनी
याने व्यक्त केले. तो मूळचा हरियानातील सोनीपत येथील आहे. लहानपणी सैनिकी स्कूलमध्ये एनडीएत येण्याची प्रेरणा त्याला मिळाली. यात आई-वडिलांचे योगदान महत्त्वाचे होते. त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे मी हे अशक्य काम पूर्ण करू शकलो, असे मत त्याने व्यक्त केले.
नौदलात उत्कृष्ट कामगिरी व्हावी : सय्यम द्विवेदी
एनडीएतील तीन वर्षे आव्हानात्मक होती. प्रशिक्षक, तसेच प्राध्यापकांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे एक एक आव्हाने पार करत गेलो. कठोर मेहनतीमुळे सशक्त बनलो. यापुढे नौदलात उत्कृष्ट कामगिरी करायची आहे, असे रौप्यपदकविजेता सय्यम द्विवेदी याने सांगितले. सय्यम मूळचा उत्तर प्रदेशातील कानपूर येथील आहे. लहानपणापासूनच लष्करात येण्याची आवड होती. घरच्यांनीही माझ्या निर्णयला पाठिंबा दिल्यामुळे तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करू शकलो, असे सय्यम म्हणाला.
तीन वर्षांच्या प्रशिक्षणाने फळ : आकाश के. आर.
तीन वर्षांच्या काळात बऱ्याच
गोष्टी शिकलो. प्रशिक्षणकाळात खूप मेहनत घेतली. या प्रशिक्षणाने सक्षम बनवले. प्राध्यापकांनी तसेच प्रशिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि जिद्दीमुळे हे प्रशिक्षण पूर्ण
करू शकलो. यापुढे भारतीय हवाई दलात फायटर पायलट व्हायचे आहे, अशी मनीषा कांस्यपदकविजेता आकाश के. आर. या विद्यार्थ्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त
केली. आकाश त्रिवेंद्रम येथील
असून तो घरातील पहिला लष्करी अधिकारी आहे.
ंएनडीएच्या प्रशिक्षणाने परिपूर्ण बनविले
तीन वर्षांत एनडीएतील खडतर
आणि कठीण प्रशिक्षणाने
परिपूर्ण बनविले. या शिक्षणाचा
वापर माझ्या देशाच्या सेवेसाठी करायचा आहे, अशी प्रतिक्रिया नायजेरियाचा विद्यार्थी एस. टी. मिनिमाह याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. भारतीय लष्कर हे जगातील उत्कृष्ट लष्कर आहे. एनडीएत मिळालेल्या मूल्यांमुळे मनोधैर्य
वाढले आहे. कवायती आणि अनुशासनामुळे शिस्त लागली आहे. माझ्या देशातील इतरांनाही याचा यामुळे फायदा होईल.
नायजेरियन लष्कर उभारणीत भारताची भूमिका महत्त्वाची
भारत आमचा मित्र देश आहे. नायजेरियन लष्कराच्या उभारणीत भारताची मोलाची भूमिका आहे. राजकीय पातळीवर दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध मजबूत आहेत. भारतीय लष्कराने एनडीएप्रमाणेच नायजेरियन डिफेन्स अॅकॅडमीची उभारणी केली आहे. तिन्ही दलाच्या विकासासाठी भारतीय लष्कराची कायम आम्हाला मदत असते. तसेच डिफेन्स स्टाफ कॉलेजची निर्मिती सध्या करण्यात येत आहे. आमच्या देशाला भविष्यात संधी आहे. भारताबरोबर लष्करी क्षेत्रात सहभाग वाढवून परिपूर्ण व्हायचे आहे, अशी प्रतिक्रिया नायजेरियन लष्करी अधिकारी आणि दिल्लीतील नायजेरियन दूतावासातील कर्नल वल नझीडी यांनी दिली.
‘सारंग’ हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कवायती!
सारंग या हेलिकॉप्टरच्या हवेतील चित्तथरारक भराऱ्या हे यंदाच्या दीक्षांत संचलनाचे प्रमुख आकर्षण ठरले. दीक्षांत संचलनानंतर ‘सारंग’ हेलिकॉप्टरच्या कसरतींनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
प्रबोधिनीच्या ‘सुदान’ या मुख्य इमारतींवरून आगमन झालेल्या सारंगने विविध सादरीकरणांतून उपस्थितांना रोमांचक अनुभव दिला. हेलिकॉप्टरच्या पायलटने केलेल्या कसरती पाहताना उपस्थितांच्या नजरा खिळल्या.
पापणी लवताच सारंग आणि हेलिकॉप्टरच्या होणाऱ्या हालचाली पाहून उपस्थित अचंबित झाले. फ्रंट फॉर्मेशन, डायमंड फॉर्मेशन, लाईन असर्टन फॉर्मेशन, सिंक्रोनाईज स्टाल टर्नम क्रॉस ओव्हर ब्रेक यांसारख्या थरारक कवायतींनी उपस्थितांचा श्वास काही काळासाठी रोखून धरला.