ठाण्याला मिळाले एनडीआरएफचे कवच
By admin | Published: June 9, 2017 03:17 AM2017-06-09T03:17:32+5:302017-06-09T03:17:32+5:30
कठीणातल्या कठीण घटनांवर नियंत्रण ठेवणारे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे (एनडीआरएफ) ठाणे शहराला आता कायमचे संरक्षण मिळाले
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या आव्हानांना तोंड देणारी, कठिणातल्या कठीण घटनांवर नियंत्रण ठेवणारे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे (एनडीआरएफ) ठाणे शहराला आता कायमचे संरक्षण मिळाले आहे. ठाणे महापालिकेने या पथकाची कायमची निवासव्यवस्था केली असून आठवडाभरातच या पथकाचे अधिकारी-कर्मचारी ठाण्यात दाखल होतील, अशी माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी लोकमतशी बोलताना दिली.
एनडीआरएफ ही आपत्कालीन क्षेत्रातील नामवंत यंत्रणा आहे. महापूर, मोठे वादळ, इमारत दुर्घटना, दरडी कोसळणे यासारख्या मोठ्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करावे लागते. अलीकडेच मुंब्य्रातील रशीद कम्पाउंडमधील आणि ठाण्यातील बी केबिन परिसरात इमारत दुर्घटना घडली होती. या वेळी शहराबाहेरून एनडीआरएफला बोलवण्यात आले होते. भविष्यात ठाणे शहरात अशा घटना घडल्यास हे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचेल, यासाठी आता महापालिकेने एनडीआरएफला कायमचे ठाण्यात आणले आहे. त्यांना पोखरण रोड नं. २ येथे कायमस्वरूपी निवासाची जागा करून देण्यात आली आहे. शहरातच कायमस्वरूपी ही यंत्रणा आल्याने कोणत्याही क्षणी आणि तातडीने ही यंत्रणा शहरातील मोठ्या घटनेप्रसंगी पोहोचण्यास मदत होणार आहे. एखाद्या मोठ्या, आव्हानात्मक घटनेत पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन एका मर्यादेपर्यंत काम करते. परंतु, या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करावे लागते. ही यंत्रणा घटनास्थळी पोहोचेपर्यंत वेळ लागतो. परंतु, आता ठाणे शहरात आल्याने मोठी दुर्घटना घडल्यास तत्काळ मदत मिळेल.
>सुरक्षा बळकट
एमएमआरडीए हद्दीत यापूर्वी असलेली ही यंत्रणा आता केवळ ठाणे शहरासाठी नव्हे, तर ठाणे जिल्ह्यासाठी काम करणार आहे. या पथकाला निवासासाठी देण्यात येणाऱ्या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच, आवश्यक बाबीही महापालिकेने दिल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था बळकट झाली आहे.