Central Railway: मध्य रेल्वेची तिकीट तपासणी मोहीम; १.५० लाख प्रकरणांमधून ९.५ कोटी वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 09:58 PM2021-06-03T21:58:38+5:302021-06-03T21:59:35+5:30
Central Railway: मध्य रेल्वेने बोनाफाइड रेल्वे प्रवाशांना चांगली सेवा देण्याच्या प्रयत्नात तसेच विनातिकिट प्रवासाला आळा घालण्यासाठी विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांविरूद्ध नियमित मोहीम राबविली.
डोंबिवली :मध्य रेल्वेने बोनाफाइड रेल्वे प्रवाशांना चांगली सेवा देण्याच्या प्रयत्नात तसेच विनातिकिट प्रवासाला आळा घालण्यासाठी विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांविरूद्ध नियमित मोहीम राबविली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कोविड प्रोटोकॉलनुसार केवळ अनुमती असलेले प्रवासी ट्रेनमधून प्रवास करतील हे सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेच्यामुंबई विभागाने उपनगरी आणि गैरउपनगरी/ मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सखोल आणि नियमित तिकीट तपासणी मोहीम चालविली.
मे -२०२१ च्या महिन्यात विनातिकीट/अनियमित प्रवाशांची ५४,००० प्रकरणे आढळून आली आणि त्यांतून रू. ३.३३ कोटी दंड म्हणून वसूल करण्यात आले. यामध्ये उपनगरी भागातील ३२,००० प्रकरणांचा समावेश असून त्यात रु. १.६५ कोटी रुपये आणि गैर-उपनगरी विभागात २२,००० प्रकरणांचा समावेश असून त्यातून १.६८ कोटी रुपये वसूल करण्यात आले. दि. १.४.२०२१ ते ३१.५.२०२१ या कालावधीत, विनातिकीट/अनियमित प्रवाशांची एकूण १.५० लाख प्रकरणे आढळून आली ज्यामध्ये गैरउपनगरी गाड्या (लांब पल्ल्याच्या गाड्या) आणि उपनगरी गाड्यांमधून दंड म्हणून रु. ९.५० कोटी वसूल करण्यात आले.
या व्यतिरिक्त तिकिट तपासणी कर्मचा-यांच्या विशेष पथकाने दि. १७.४.२०२१ ते २.६.२०२१ या कालावधीत मुखपट्टी न घातलेल्या व्यक्तींची १२६९ प्रकरणांमधून रू. २,४०,६४५ इतकी रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणार्या अनधिकृत प्रवासाची २०१८ प्रकरणेही आढळून आले आणि दि. ०१.४.२०२१ ते ३१.५.२०२१ या कालावधीत रू. १०,०९,०००/- इतकी रक्कम दंड म्हणून वसूलण्यात आली.
मध्य रेल्वेने प्रवाशांना असुविधा टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी आणि कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.