‘नीट’च्या ‘केमिस्ट्री’त गडबड; ५ गुणांचे नुकसान; विद्यार्थी न्यायालयात धाव घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 03:06 AM2019-06-06T03:06:07+5:302019-06-06T03:06:29+5:30

एनईईटी ५ मे रोजी झाली होती. त्यानंतर मेच्याच शेवटच्या आठवड्यात प्राथमिक उत्तर सूची वेबसाइटवर टाकण्यात आली. त्यावरील चूक उत्तरासंदर्भात ३१ मे पर्यंत आक्षेप घ्यायचे होते.

'Neat' chemistry disturbs; Loss of 5 points; Students will run in court | ‘नीट’च्या ‘केमिस्ट्री’त गडबड; ५ गुणांचे नुकसान; विद्यार्थी न्यायालयात धाव घेणार

‘नीट’च्या ‘केमिस्ट्री’त गडबड; ५ गुणांचे नुकसान; विद्यार्थी न्यायालयात धाव घेणार

Next

लातूर : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या एनईईटीचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर झाला. त्याच्या तासभर आधी अंतिम उत्तरसूची वेबसाईटवर टाकण्यात आली. त्यामध्ये केमिस्ट्री विषयातील आक्षेप न घेतलेल्या एका प्रश्नाचे उत्तर अंतिम सूचीत बदलण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांचे पाच गुण कमी झाले आहेत.

एनईईटी ५ मे रोजी झाली होती. त्यानंतर मेच्याच शेवटच्या आठवड्यात प्राथमिक उत्तर सूची वेबसाइटवर टाकण्यात आली. त्यावरील चूक उत्तरासंदर्भात ३१ मे पर्यंत आक्षेप घ्यायचे होते. परंतु, केमिस्ट्रीतील आक्षेप न घेतलेल्या एका प्रश्नाचे उत्तर अंतिम सूचीत बदलण्यात आले. प्राथमिक सुचीतीलच उत्तर बरोबर होते, असा दावा विद्यार्थी तसेच विषय तज्ज्ञांनी केला आहे. शिवाय, उत्तर सुची जारी झाल्यानंतर तासाभरातच निकाल हाती आल्याने विद्यार्थ्यांना आक्षेप घेता आलेले नाहीत.

केमिस्ट्रीच्या सेट क्रमांक पी-४ मधील प्रश्न क्र. १६३ च्या थर्मोडायनामिक्स पाठातील गणित होते. ज्याचे ‘मायनस ३० जे’ हे उत्तर बरोबर होते आणि तेच प्रथम उत्तर सुचीत नमूद केले होते. परंतु, अंतिम उत्तर सुचीत ‘३० जे’ हे उत्तर बरोबर दाखविण्यात आले आहे, जे की, चुकीचे आहे. केमिस्ट्री विषय तज्ज्ञ, प्राध्यापकांनीही नीटच्या अंतिम सुचीतील उत्तर चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, बायोलॉजीमधील तीन प्रश्नांवर आक्षेप घेण्यात आले होते. परंतु, त्या तिन्ही प्रश्नांवरील आक्षेप फेटाळले आहेत. सदरील तिन्ही प्रश्नांची उत्तरे एनसीईआरटीच्या पुस्तकातून लिहिण्यात आली होती. मात्र नॅशनल टेस्टिंग एजन्सीने त्या पुस्तकातील दाव्याला मान्य केले नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतले त्या प्रत्येक प्रश्नासाठी पाच गुण कमी झाले. या संदर्भात राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या सीईटी सेलचे संचालक प्रा.डी.के. देशमुख म्हणाले, पुस्तकातच चुकीचा संदर्भ असेल तर तो मान्य होणार नाही. शिवाय, नीटसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम आखून देण्यात आलेला आहे. त्यासाठी ठराविक अभ्यासक्रमाची पुस्तके उपयोगात आणावीत, असा नियम नाही. त्यामुळे त्या तीन प्रश्नांबाबत गल्लत झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र केमिस्ट्रीच्या एका प्रश्नातील उत्तराची गडबड झाली आहे.

मेडिकल प्रवेश पर्सेंटाईलवर?
‘नीट’च्या निकालात यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे गुणपत्रिकेत एकूण गुणांबरोबर प्रत्येक विषयाचे पर्सेंटाईल तसेच एकूण गुणांचे पर्सेंटाईल देण्यात आलेले आहे. त्यामुळे यापुढील प्रवेश प्रक्रिया पर्सेंटाईलवर होऊ शकेल. तसेच पूर्वीप्रमाणेच यावेळीही आॅल इंडिया रँक देण्यात आल्याने तोही प्रवेश प्रक्रियेचा मार्ग आहे. मात्र ७२० पैकी विद्याथर्यांना मिळालेले एकूण गुण नमूद केले असले तरी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे गुण न देता त्या विषयाचे पर्सेंटाईल गुणपत्रिकेत देण्यात आले आहेत.

न्यायालयात जाणार विद्यार्थी, पालक...
केमिस्ट्रीच्या एका बरोबर उत्तराला अंतिम सुचीत चूक दर्शवून उत्तरात बदल केला आहे. एनसीआरटीच्या पुस्तकातील पृष्ठ क्र. १६६ व १८९ वर त्याचे उत्तर बरोबर आहे. त्यामुळे अन्याय झालेले विद्यार्थी व पालक न्यायालयात धाव घेणार आहेत. -प्रा. शिवराज मोटेगावकर
अंतिम सूचीतील उत्तर चुकले

मायनस ३० जे हे उत्तर बरोबर असताना अंतिम उत्तर सूचीत चूक उत्तर देऊन विद्यार्थ्यांच्या पाच गुणांचे नुकसान झाले आहे. केमिस्ट्रीच्या कोणत्याही अभ्यासकाने अथवा विषय तज्ज्ञाने प्रॉब्लेम सोडविला तर उत्तर मायनस ३० जे हेच येईल. - प्रा. डी. के. देशमुख

कट ऑफ वाढण्याची शक्यता
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा नीट परीक्षा सोपी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची रॅकिंग वाढली आहे. परिणामी यंदा मेडिकल प्रवेशाचा कट आॅफ वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांकडून केवळ एक ते दोन महिनेच नीट परीक्षेची तयारी केली जाते. त्यामुळे राज्यातील नीट परीक्षेत पात्र ठरणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. विद्यार्थ्यांनी दोन वर्षांपासूनच नीटची तयारी सुरू करणे आवश्यक आहे, असे प्रवेश पूर्व परीक्षांच्या अभ्यासकांकडून सांगितले जात आहे.

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे ठरविलेच असल्यामुळे अभ्यास करावाच लागणार होता. कुटुंबात वैद्यकीय क्षेत्रातील वातावरण असल्यामुळे साहजिकच आई-वडिलांचे प्रोत्साहन होतेच. परंतु नियमित सराव आणि सहा तास अभ्यास करून एका ध्येयासाठी केलेली मेहनत फळास आली, याचा नक्कीच अभिमान आहे. त्यातही नाशिकचा लौकिक वाढवू शकलो यासारखा आनंद नाही. - सार्थक भट, नाशिक (राज्यात प्रथम)
 

Web Title: 'Neat' chemistry disturbs; Loss of 5 points; Students will run in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा