बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी कर्जमाफी हवी, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
By Admin | Published: March 16, 2017 12:26 PM2017-03-16T12:26:20+5:302017-03-16T12:26:20+5:30
निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर कर्जमाफीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - शेतकरी कर्जमाफीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन देत असताना विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. मात्र गोंधळातही मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण सुरु ठेवत विरोधकांना उत्तर दिलं आहे. निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर कर्जमाफीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
कर्जमाफीसाठी 30 हजार 500 कोटींची आवश्यकता आहे. सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही, मात्र कर्जमाफ केल्यास विकासासाठी पैसा उरणार नाही असं देवेंद्र फडणवीस बोलले आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना धारेवर धरत विरोधकांना शेतक-यांशी काही घेणं देणं नाही, त्यांना केवळ कर्जमाफीचं राजकारण करायचं आहे. कर्जमाफी केल्यानंतर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची जबाबदारी विरोधक घेणार का ? असा सवाल विचारला.
बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी विरोधकांना कर्जमाफी हवी आहे असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला. दुष्काळानंतर भाजपाने थेट आठ हजार कोटी दिले. बँका कर्जमुक्ती होतील, पण शेतकरी कर्जातच राहील, त्यामुळे शिष्टमंडळ केंद्राशी बोलणी करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ज्या राज्यात कृषी क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक, त्या राज्यातला शेतकरी सर्वात सुखी असतो. कर्जमाफी नंतर पाच वर्षात 16 हजार आत्महत्या झाल्या, कर्जमाफी आवश्यक असून ती कधी दिली पाहिजे हे ठरवणं आवश्यक असल्याचंही ते बोलले आहेत.
भांडवली खर्च शेतकऱ्यांकरिता झाला पाहिजे. 31 हजार कोटीपैकी कृषीसाठी 19 हजार 434 कोटी खर्च करतो, हा रेकॉर्ड आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.