शिक्षण क्षेत्रात बदलाची गरज
By admin | Published: June 26, 2015 02:35 AM2015-06-26T02:35:42+5:302015-06-26T02:35:42+5:30
देशाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त संशोधनाची गरज असून औद्योगिक कंपन्यांनी शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करून संशोधनाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.
पुणे : देशाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त संशोधनाची गरज असून औद्योगिक कंपन्यांनी शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करून संशोधनाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. जागतिकीकरणातील वास्तव स्वीकारून आपल्या शिक्षण क्षेत्रात बदल करावे लागणार आहेत, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी व्यक्त केले.
भारती विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी बोलत होते. राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यापीठाचे संस्थापक व कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम आदी यावेळी उपस्थित होते.
देशातील विद्यापीठांमधून तसेच आयआयटी, एनआयटी सारख्या संशोधन संस्थांमधून गेल्या कित्येक वर्षांपासून एकही नोबेल पारितोषिक मिळविणारा संशोधक निर्माण होत नाही, याबाबत खंत व्यक्त करून राष्ट्रपती म्हणाले, देशातील विद्यार्थी परदेशी विद्यापीठात जाऊन नोबेल लॉरीएट होतात. विद्यार्थ्यांमध्ये क्षमता आहे. योग्य मार्गदर्शक शिक्षकही आहेत. आता अधिकाधिक नोबेल लॉरिएट कसे निर्माण होतील या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. जर्मनी, अमेरिका, ब्राझील यांसह अनेक विकसनशील देशांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या तुलनेत भारतातील विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे. त्यात वाढ करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे ते म्हणाले.
जागतिक क्रमवारीत पहिल्या २०० विद्यापीठांत देशातील एकाही शैक्षणिक संस्था नाही. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर देण्याची अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली. भारती विद्यापीठ परिवाराच्या वतीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते डॉ. पतंगराव कदम यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.