औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा अभ्यासक्रम बदलण्याची गरज : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 10:03 PM2020-01-07T22:03:56+5:302020-01-07T22:05:04+5:30
उद्योजक-सरकारमधे हवा समन्वय
पुणे : बदलत्या काळानुसार औद्योगिक प्रशिक्षण देणाºया संस्थांच्या अभ्यासक्रमामधे बदल करणे गरजेचे आहे. हा बदल करण्यासाठी उद्योजक आणि कौशल्य विकास विभागासमवेत समन्वय ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे वतीने उच्च कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. राज्य उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक, कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क अध्यक्ष दिलीप बंड, महासंचालक राजेंद्र जगदाळे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, महासंचालक प्रशांत गिरबाने यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, बदलत्या काळानुसार आणि विविध क्षेत्रांच्या मागणीनुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या शिक्षणपद्धतीत बदल केला पाहिजे. त्याचबरोबर कौशल्य विकास विभाग सक्षम होणे गरजेचे आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हा व तालुका स्तरावर विविध अभ्यासक्रमांची प्रशिक्षण केंद्र सुरु करायला हवीत.
उद्योगाला आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यासाठी वरिष्ठ अधिकारी व महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येईल, असे मलिक यांनी सांगितले. दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वतीने सुरु असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्रदीप भार्गव, उद्योजक मुकेश मल्होत्रा, प्रतापराव पवार, विक्रम साळुंखे, सतीश मगर, प्रमोद चौधरी, भरत आगरवाल, विनय ओसवाल, दिलीप बोराळकर, राजेश गुप्ते, दिपक करंदीकर, उमा गणेश, स्वाती मुजुमदार, आनंद खांडेकर यांनीही कौशल्य विकास क्षेत्रातील रोजगाराच्या संधी बाबत सादरीकरण केले.