चर्चा हवी की कर्जमाफी, सभागृहात काँग्रेस गोंधळली

By admin | Published: December 9, 2015 01:24 AM2015-12-09T01:24:25+5:302015-12-09T01:24:25+5:30

विधानसभेवर आज प्रचंड मोर्चा नेऊन कर्जमाफीसाठी एल्गार करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे याच मुद्यावर विधानसभेतील फ्लोअर मॅनेजमेंट आज चुकले.

Need to discuss whether the debt waiver, Congress in the House is a mess | चर्चा हवी की कर्जमाफी, सभागृहात काँग्रेस गोंधळली

चर्चा हवी की कर्जमाफी, सभागृहात काँग्रेस गोंधळली

Next

नागपूर : विधानसभेवर आज प्रचंड मोर्चा नेऊन कर्जमाफीसाठी एल्गार करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे याच मुद्यावर विधानसभेतील फ्लोअर मॅनेजमेंट आज चुकले. आधी कर्जमाफीच्या मुद्यावर चर्चेची मागणी करणाऱ्या काँग्रेसने ती मान्य होताच ‘चर्चा नको, कर्जमाफीची घोषणा करा’असे नारे देत गदारोळ केला.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी, ‘राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून बाकीचे कामकाज बाजूला ठेवून त्यावर आधी चर्चा करा, अशी मागणी केली. कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही, असे ते म्हणाले. त्या पाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणा द्यायला सुरुवात केली. अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कोणी दाद देत नव्हते.
या गदारोळात महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी, सर्व कामकाज बाजूला ठेवून दुष्काळावर चर्चेची सरकारची तयारी आहे, आता चर्चा सुरू करा, असे सांगितले. माजी वित्तमंत्री राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनीही चर्चेचा आग्रह धरला. शिवसेना सरकारला सहकार्य करेल की नाही असे शंकायुक्त वातावरण सध्या असताना शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. आज काँग्रेसचा मोर्चा असल्याने त्यांना दुष्काळाचे राजकारण करायचे आहे. दुष्काळाची एवढीच चिंता असेल तर आधी चर्चेत सहभागी व्हा, असे आव्हान त्यांनी दिले.
राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कांद्याचे निर्यातमूल्य कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत प्रयत्न करावा. तसे झाले तर कांद्याच्या भावातील सध्याची घसरण थांबेल, अशी मागणी केली.
दुष्काळावरील चर्चेची मागणी सरकारने मान्य करूनही काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी, फलक फडकविणे, कागदाचे तुकडे हवेत भिरकवणे सुरूच ठेवले. त्यामुळे काँग्रेसला नेमके काय म्हणायचे आहे या बाबत गोंधळ निर्माण झाला. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी, चर्चेपेक्षा कर्जमाफीची घोषणा करा, अशी मागणी केली. गदारोळातच अध्यक्ष बागडे यांनी कामकाज दोनवेळा तहकूब केले. ते पुन्हा सुरू झाल्यानंतर, ‘चर्चा नको, घोषणा करा’, अशा घोषणा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सुरू केल्या. गोंधळातच सभागृहाचे काम रेटण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Need to discuss whether the debt waiver, Congress in the House is a mess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.