कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रयत्नांची गरज : व्यंकय्या नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 03:21 AM2018-02-26T03:21:29+5:302018-02-26T03:21:29+5:30

संपूर्ण जगात दरवर्षी कुष्ठरोगाची अडीच लाख नवी प्रकरणे समोर येतात. त्यातील ६० टक्के भारतातील असतात. भारताने कुष्ठरोगाच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष पुरवायला हवे.

 Need for efforts to eradicate leprosy: Venkaiah Naidu | कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रयत्नांची गरज : व्यंकय्या नायडू

कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रयत्नांची गरज : व्यंकय्या नायडू

googlenewsNext

वर्धा/सेवाग्राम : संपूर्ण जगात दरवर्षी कुष्ठरोगाची अडीच लाख नवी प्रकरणे समोर येतात. त्यातील ६० टक्के भारतातील असतात. भारताने कुष्ठरोगाच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष पुरवायला हवे. समाजात जागरुकता निर्माण करावी लागेल. कुष्ठरोगाच्या समूळ निर्मूलनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांवर भर द्यावा, असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे व्यक्त केले.
महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालय येथे डॉ. एम.डी. गुप्ते व डॉ. अतुल शहा यांना कुष्ठरोग निर्मूलन कार्यातील उल्लेखनीय सेवेबद्दल गांधी मेमोरिअल लेप्रसी फाउंडेशनचा आंतरराष्ट्रीय गांधी कुष्ठरोग सेवा पुरस्कार २०१७ नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उपराष्ट्रपती म्हणाले की, मानवसेवा हीच माधवसेवा अर्थात ईश्वरसेवा असल्याची गांधीजींची शिकवण होती. गांधीजींचे विचार आजही सुसंगत ठरतात. खादी स्वावंलबन व साधेपणाचे प्रतीक आहे, असे स्वदेशीबाबत शिकवण देताना गांधीजींनी सांगितले होते. त्यामुळे खादी उत्पादन मनरेगाशी जोडण्याची संकल्पना उपयुक्त ठरू शकते.
१९५० मध्ये स्थापन गांधी मेमोरियल लेप्रसी फाउंडेशनने या रोगाच्या निर्मूलनासाठी चांगली कामगिरी करीत हा एक कलंक असल्याची समाजातील कल्पना दूर केली. या फाउंडेशनने कुष्ठरोग्यांवर उपचार केले. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कामही केले. २०१२-१३ या काळात कुष्ठरोग्यांची संख्या ८३ हजार होती व त्यांचे प्रमाण १० हजार लोकसंख्येत ०.६८ टक्के होते. २०१२ पर्यंत देशातील ६४० जिल्ह्यांपैकी ५४२ जिल्ह्यांतून या रोगाचा समूळ नायनाट करण्यात यश आले असले तरी नवी प्रकरणे पुढे येत आहे, याबाबत नायडू यांनी चिंता व्यक्त केली. उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. रामदास तडस, खा.डॉ. विकास महात्मे, संस्थेचे अध्यक्ष धिरू मेहता, जे. के. बांठिया, डॉ. बी.एस. गर्ग, पी.एल. तापडिया आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सेवाग्राम आश्रमाला भेट : नायडू यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधीजींच्या आश्रमाला भेट दिली. प्रथम त्यांनी आदी निवासाला भेट दिली. त्यानंतर बापू कुटी व आश्रमातील सर्व परिसराची पाहणी केली. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर यांनी सुतमाळ व पुस्तक देऊन उपराष्ट्रपतींचे स्वागत केले. बापू कुटीमध्ये सर्वधर्म प्रार्थना, एकादश व्रत व भजन झाले. त्यानंतर बापू कुटीसमोर वºहांड्यातील चरखाची माहिती त्यांनी जाणून घेतली. येथे काम करणा-या महिलांशी त्यांनी संवाद साधला. महादेव कुटीतील कापूस ते कापड हा आश्रमचा उपक्रम त्यांनी समजावून घेत पाहणी केली.
मनरेगाद्वारे खादीला प्रोत्साहन देण्याची मागणी
आश्रमचे मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी चरखा आणि विणाईला मनरेगात समाविष्ट केले तर ग्रामीण भागात रोजगाराची संधी निर्माण होईल आणि खादीला प्रोत्साहन मिळेल. यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी करीत निवेदन दिले. यावर उपराष्ट्रपतींनी सकारात्मक प्रतिसाद देत पंतप्रधानांना शिफारस केली जाईल, अशी ग्वाही दिली.

Web Title:  Need for efforts to eradicate leprosy: Venkaiah Naidu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.