दलित चळवळींना योग्य दिशा देण्याची गरज
By admin | Published: January 5, 2015 04:34 AM2015-01-05T04:34:54+5:302015-01-05T04:34:54+5:30
शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी दलित चळवळी योग्य दिशेने घेऊन जाण्याची गरज आहे़ दलिताची व्याख्या एका जातीपुरती मर्यादित नाही़
भारत दाढेल, नांदेड
शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी दलित चळवळी योग्य दिशेने घेऊन जाण्याची गरज आहे़ दलिताची व्याख्या एका जातीपुरती मर्यादित नाही़ सर्व घटकांना सोबत घेऊन जावे लागेल, त्यातच मानवतेची कल्पना आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत डॉ़ माधव गादेकर यांनी रविवारी केले़
३२व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दलितांच्या सांस्कृतिक व राजकीय चळवळी दिशाहीन झाल्या आहेत, या विषयावर परिसंवाद झाला़ अध्यक्षस्थानी डॉ़ कृष्णा किरवले होते़ डॉ़ मा़ प़ थोरात, डॉ़ के़ के़ अहिरे, प्रा़ सुधीर अनवले, डॉ़ माधव गादेकर, अमर हबीब, डॉ़ गोपाल उपाध्ये, प्रा़ रामनाथ चव्हाण यांनी सहभाग घेतला़
डॉ़ गादेकर म्हणाले, की डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आदर्श दिले आहेत, ते चळवळीत दिसत नाहीत़ १९६० नंतरच्या दलित चळवळी मानवतेचा संदेश देण्यासाठी रूढ झाल्या होत्या़ मात्र आता या चळवळीचे रूप हिडीस दिसत आहे़ ज्या चळवळीतून प्रबोधन होणे गरजेचे होते, ते होताना दिसून येत नाही़ डॉ़ बाबासाहेबांनी जी चळवळ उभी केली होती, ती आता दिसत नाही़ जयंतीच्या माध्यमातून पूर्वी व्याख्यानाचे, शाहिरीचे कार्यक्रम होत असत़ आता ते ऐकण्याची मानसिकता राहिली नाही़ ते समजून सांगितले पाहिजे़
डॉ़ रामनाथ चव्हाण म्हणाले, दलित म्हणजे बौद्ध का? दलित शब्दाच्या व्याख्येत आणखी कोण कोण आहेत? बौद्धेतर जे दलित आहेत ते हिंदू म्हणून जगत आहेत़ त्यांच्या चळवळीविषयी आपण का बोलत नाही़ त्यांची चळवळ कुठे आहे, या प्रश्नांचा शोध घेतला पाहिजे़
डॉ़ के़ के़ अहिरे यांनी दलित संस्कृती खऱ्या अर्थाने बौद्ध संस्कृती असल्याचे सांगितले़ डॉ़ मा़ प़ थोरात म्हणाले, जोपर्यंत आपण ब्राह्मणी संस्कृती सोडणार नाही तोपर्यंत आपण मानवतावादी संस्कृती रुजवू शकणार नाही़ अध्यक्षीय समारोपात कृष्णा किरवले म्हणाले,
मानवी जीवनाला आकार देणारी सर्वमान्य झालेली विचारसरणी म्हणजे संस्कृती़ तेव्हा आपले चांगले काय आहे, हे सांगण्यासाठी वेळ खर्च करावा़ ब्राह्मणांवर टीका, टिंगलटवाळी करण्याऐवजी आपल्या चांगल्या गोष्टींचा प्रसार करावा़, असेही त्यांनी आवर्जून सांगितले़ (प्रतिनिधी)