वैद्यकीय उपकरणांच्या पुनर्वापराबाबत गाइडलाइन हवी
By admin | Published: May 28, 2017 12:58 AM2017-05-28T00:58:47+5:302017-05-28T00:58:47+5:30
वैद्यकीय उपकरणांचा मुद्दा सध्या प्रसिद्धिमाध्यमात चर्चिला जात आहे आणि तोही वाईट अर्थाने. कायद्याने परवानगी नसतानाही काही हॉस्पिटलकडून वैद्यकीय उपकरणांचा
- महेंद्रकुमार बाजपाई
वैद्यकीय उपकरणांचा मुद्दा सध्या प्रसिद्धिमाध्यमात चर्चिला जात आहे आणि तोही वाईट अर्थाने. कायद्याने परवानगी नसतानाही काही हॉस्पिटलकडून वैद्यकीय उपकरणांचा पुनर्वापर केला जाणे आणि त्यासाठी नव्या उपकरणांची किंमत वसूल केली जाणे ही अगदी अलीकडची वादग्रस्त बातमी. वैद्यकीय उपकरणांच्या पुनर्वापराबाबत योग्य मार्गदर्शक तत्त्वे असणे ही काळाची गरज आहे आणि ती सातत्याने वाढणाऱ्या उपकरणांच्या किमतींवर नियंत्रण बसवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
पुनर्वापर होणाऱ्या वैद्यकीय उपकरणांसाठी अतिरिक्त आकार वसूल केला जाणे ही अतिशय चिंतेची बाब आहे. यासाठी दोषी हॉस्पिटल आणि डॉक्टरांवर केवळ एफडीएनेच कारवाई केली पाहिजे असे
नाही तर हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध भारतीय दंड विधानांतर्गत फसवणुकीची फौजदारी कारवाईही व्हायला हवी.
वैद्यकीय उपकरणांच्या पुनर्वापराचा हा मुद्दा गुंतागुंतीचा आहे. पहिले म्हणजे भारतात वैद्यकीय उपकरणांचा पुनर्वापर रोखण्याबाबत काही वैधानिक मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आलेली नाहीत अथवा ठोस कायदाही नाही. अनेक वैद्यकीय उपकरणांचा येथे सर्रास पुनर्वापर होतो. अगदी शस्त्रक्रिया करण्याचा चाकू, कात्री येथपासून इंडोस्कोपीपर्यंत काहीही. यात काही शंका नाही की ते अतिशय निर्जंतुक आणि स्वच्छ अवस्थेत ठेवण्याचा प्रयत्न होतो.
मात्र तरीही जगातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये त्याला संसर्ग पोहोचण्याचा धोका उद्भवू शकतो. असे संसर्ग शस्त्रक्रियांमध्ये त्रासदायी ठरू शकतात, हे वैद्यकीय विज्ञानात स्पष्ट आहे. जर वैद्यकीय उपकरणांच्या पुनर्वापरावर कायद्याने बंदी असेल आणि सर्व उपकरणे आणि साहित्य एकदा वापरल्यावर फेकायची म्हटली तर पाच हजारांत होणाऱ्या इंडोस्कोपीसाठी तीन लाखांपेक्षा कमी रक्कम लागणार नाही. किंमत कमी होण्याचे हे प्रमाण पुनर्वापराला प्रवृत्त करते.
स्टेंट्स, गायडिंग वायर, डायलिसीस फिल्टर अशा साहित्याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. मात्र त्यांचे योग्य निर्जंतुकीकरण होते की नाही हे पाहण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनासारखी सरकारी यंत्रणा सक्षम हवी. नियमित आॅडिट, अचानक केली जाणारी पाहणी आणि गैरप्रकार आढळल्यास जबर
दंड यामुळे याला आळा बसू शकतो. मात्र अमेरिकेसारख्या देशात तेथील अन्न आणि औषध प्रशासन
व्यवस्था सिंगल युज डिव्हाइसेस धोरण राबवत असतानाही तेथे पुनर्वापर केला जातो, हे लक्षात घ्यायला हवे.
या प्रकरणाला आणखी एक किनार आहे ती म्हणजे उपकरणे तयार करणाऱ्या उत्पादकांची. काही उपकरणे ही एकदाच वापरावयाची अथवा वापरल्यावर फेकून द्यायची (डिस्पोजेबल) असल्याचे घोषित केले जाते. पुनर्वापर म्हणजे रुग्णाला त्या उपचारांसाठी कमी खर्च लागणे. मात्र हॉस्पिटल पुनर्वापर करीत नाहीत. कारण उत्पादकाच्या त्याबाबतच्या सूचना.
कारण त्या सूचनांचे पालन न करणे म्हणजे हलगर्जीपणा ठरतो. अशाच हलगर्जीच्या एका प्रकरणात ११ कोटींची नुकसानभरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याचे एक कारण होते, औषधासोबत देण्यात आलेल्या माहितिपत्रकातील डोसपेक्षा डॉक्टरांनी दिलेला डोस अधिक होता.
वैद्यकीय उपकरणे आणि सेवेचे वाढते दर हे रुग्ण आणि डॉक्टरांमधील मतभेद आणि दरी वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे आणि त्याला जबाबदार आहे धोरण तयार करणाऱ्यांची याबाबतची आस्था. म्हणूनच याबाबतचा संभ्रम दूर होण्यासाठी वैद्यकीय उपकरणांच्या पुनर्वापराबाबत निश्चित नियमावली अत्यावश्यक आहे.
(लेखक हे ‘इन्स्टिट्यूट आॅफ मेडिसिन अॅण्ड लॉ’चे संचालक आहेत.)