भविष्यात स्मॉल अर्बन संकल्पना राबविण्याची गरज- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 05:44 AM2019-01-31T05:44:08+5:302019-01-31T05:44:23+5:30
नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाचा १0५वा वर्धापन दिन
नवी मुंबई: नागरीकरणाची नवी तत्त्वे व उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून जर्मनीच्या धर्तीवर स्मॉल अर्बन अर्थात छोटी शहरे निर्माण करण्याची गरज आहे. या संकल्पनेवर काम करण्यासाठी आता नगर रचना विभाग सक्षम बनला आहे. कारण मागील तीस वर्षांत जेवढी कामे झाली नाहीत, ती केवळ सव्वा वर्षात झाली आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नगरविकास विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाचा १0५ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशी येथील सिडको एक्झिबिशन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगररचना विभागातील उल्लेखनीय कामांचे अनावरण व नवनियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, नगररचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाचे संचालक नोरेश्वर शेन्डे आदी उपस्थित होते.
नगररचना विभाग अडवणूक करणारा विभाग म्हणून बदनाम आहे, परंतु आता अडवणूक नव्हे तर सोडवणूक करायला पाहिजे. रेग्युलेटर नव्हे, तर प्रमोटर म्हणून काम करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांना केले. याप्रसंगी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांचीही भाषणे झाली. तर नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाचे संचालक नोरेश्वर शेन्डे यांनी कामकाजाचा आढावा घेतला.
लहान शहरे लवकरच
नियोजन फसल्याने शहरे बकाल झाली आहेत. त्यामुळे आता रिअर्बनायझेशन अर्थात नव्याने नागरीकरणाचा विचार करायला हवा. पायाभूत सुविधा, संधी आणि मनोरंजनाची साधने यांच्या विकेंद्रीकरणातून लहान शहराची संकल्पना पूर्णत्वास नेणे शक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.