डाव्यांच्या एकजुटीसाठी बर्धन यांच्या नेतृत्वाची गरज
By admin | Published: January 19, 2015 01:01 AM2015-01-19T01:01:02+5:302015-01-19T01:01:02+5:30
डाव्या विचारांची चळवळ राबविणाऱ्या पक्षांसाठी सध्याचा काळ कठीण असून यातून बाहेर पडण्यासाठी सर्व डाव्या पक्षांची एकजूट महत्त्वाची आहे. यासाठी डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेते म्हणून ए.बी.बर्धन
भाकप नेत्यांचे मत : भाई बर्धन यांचा भावपूर्ण सत्कार
नागपूर: डाव्या विचारांची चळवळ राबविणाऱ्या पक्षांसाठी सध्याचा काळ कठीण असून यातून बाहेर पडण्यासाठी सर्व डाव्या पक्षांची एकजूट महत्त्वाची आहे. यासाठी डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेते म्हणून ए.बी.बर्धन यांनी नेतृत्व स्वीकारावे , असे मत भाकपचे खासदार डी. राजा यांच्यासह इतरही नेत्यांनी व्यक्त केले.
शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात रविवारी ए.बी.बर्धन यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुधाकर रेड्डी, खासदार डी. राजा.ज्येष्ठ नेते शमीम फैजी, राज्य शाखेचे सचिव भालचंद्र कानगो, अतुलकुमारअन्जान,अमरजित कौर, मनोहर देशकर, मोहनदास नायडू उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सर्व नेत्यांनी भाई बर्धन यांच्या राजकीय व कामगार चळवळीतील भरीव योगदानाचा उल्लेख करीत हा सत्कार एका व्यक्तीचा नसून तो त्याच्या संघर्षशील विचारांचा आहे,असे मत व्यक्त केले.
डी. राजा म्हणाले, डावी चळवळ सध्या अडचणीच्या काळातून मार्गक्रमण करीत असताना अशा वेळी बर्धन यांच्यासारख्या नेतृत्वाची आणि मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांच्या नेतृत्वाला सर्व डाव्या पक्षांची मान्यता असल्याने त्यांना संघटित करण्यासाठी बर्धन यांनी पुढाकार घ्यावा. डाव्या पक्षांना संघर्षाचा इतिहास असून बर्धन हे त्याचे प्रतीक आहे. त्यांच्या विचारातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते.
शमीम फैजी म्हणाले की, डाव्या पक्षातील फुटीचे दुख: बर्धन यांना आजही आहे. सध्या देशात ज्या प्रकारे कार्पोरेट घराण्यांचे वर्चस्व वाढत चालले आहे. त्याला रोखण्यासाठी डाव्या पक्षाची एकजूट आवश्यक असून त्यासाठी बर्धन यांचेच नेतृत्व आवश्यक आहे. भारतीय राजकारणात ज्या काही मोजक्या नेत्यांना सर्वच पक्षात सन्मान व मान्यता आहे त्यात बर्धन यांचा समावेश असून त्यांच्या विचाराची डाव्या पक्षाला आणि देशाला गरज आहे.
भालचंद्र कानगो म्हणाले की, बर्धन यांनी त्यांच्या आयुष्यातील ७५ वर्ष डाव्या चळवळीसाठी घालविली. हा त्यांच्या विचाराचा सत्कार आहे. डाव्या पक्षाची एकजूट हे बर्धन यांचे ध्येय असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.यावेळी अमरजित कौर आणि अतुलकुमार अन्जान यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन सत्कार समितीचे निमंत्रक मोहन शर्मा यांनी केले. आभार अजय शाहू यांनी मानले. कार्यक्रमाला विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी व राजकीय नेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)