नाशिकमधील गरजवंतांची आधार ‘कपडा बँक’
By admin | Published: October 24, 2016 05:27 AM2016-10-24T05:27:09+5:302016-10-24T05:27:09+5:30
नागरिक इच्छेने वापरात नसलेले चांगले कपडे देतात आणि ज्याला गरज आहे असे गोरगरीब नावे नोंदवून
नाशिक : नागरिक इच्छेने वापरात नसलेले चांगले कपडे देतात आणि ज्याला गरज आहे असे गोरगरीब नावे नोंदवून आवश्यकतेनुसार कपडे घेऊन जातात. ‘जॉय आॅफ गिव्हिंग’ संकल्पनेतून चालणाऱ्या ‘कपडा बँके’मुळे गरजू लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
रोटरी क्लब आॅफ नाशिक ईस्टने जेलरोडवरील सेंट फिलोमिना शाळेसमोर पाच आठवड्यांपूर्वी सुरू केलेल्या या बँकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवीन कपडे खरेदी करताना, वापरात नसलेले कपडे या बॅँकेत देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पाच आठवड्यांत सुमारे ११ ते १२ हजार कपड्यांचे वाटप करण्यात आले आहे.
साधारणत: वापरलेले, परंतु सुस्थितीत असलेले कपडे फेकून न देता, रोटरीकडे जमा करण्याचे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले होते, अशी माहिती डॉ. मनोज कलंत्री यांनी दिली.
जिल्हाभरातून कपडा बँकेत कपडे जमा होत असून, दान म्हणून मिळालेले कपडे स्वच्छ धुऊन आणि इस्त्री करून ठेवले जातात. गरजूंनी नाव नोंदविल्यावर ते त्यांना सुपूर्द केले जातात. रोटरी नाशिक ईस्टचे अध्यक्ष डॉ. मनोज कलंत्री आणि शासकीय संदर्भ रुग्णालयातील डॉ. विद्यासागर बाहेती यांना कपडा बँकेची कल्पना सुचली. त्यांना संजय अग्रवाल यांनी जागा वापरण्यासाठी दिली. या प्रकल्पाचे अध्यक्ष अतुल मलानी, डॉ. प्रशांत भुतडा आदींच्या सहकार्यातून बँकेला मूर्त रूप आले.