शाश्वत सिंचन देण्याची गरज

By admin | Published: January 18, 2016 03:45 AM2016-01-18T03:45:11+5:302016-01-18T03:45:11+5:30

कोकणातील जलसमस्या सोडवायची असेल तर सर्वांचाच पुढाकार आवश्यक आहे. नदी-नाल्यांचे पुनरुज्जीवन करून शाश्वत सिंचन देण्याची आज खरी आवश्यकता आहे.

The need for sustainable irrigation | शाश्वत सिंचन देण्याची गरज

शाश्वत सिंचन देण्याची गरज

Next

खेड (जि.रत्नागिरी) : कोकणातील जलसमस्या सोडवायची असेल तर सर्वांचाच पुढाकार आवश्यक आहे. नदी-नाल्यांचे पुनरुज्जीवन करून शाश्वत सिंचन देण्याची आज खरी आवश्यकता आहे. त्यासाठी नियोजन हवे, आवश्यकता पडल्यास लागेल तेवढा निधी देऊ आणि कोकणाबरोबरच अवघा महाराष्ट्र येत्या पाच वर्षांमध्ये दुष्काळमुक्त करू, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेड येथे व्यक्त केला.
खेड तालुक्यातील महाळुंगे गावातील जगबुडी नदी येथे फडणवीस यांच्या हस्ते जलचेतना परिषद व जलोपासना अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांच्यासह राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, संपर्कमंत्री प्रकाश मेहता, भटक्या विमुक्त जमातीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते व अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ. राजेंद्रसिंह यांनी कोकणाला लक्ष्मी अशी उपमा दिली. कोकण हे सुख आणि समृद्धीचे माहेर असल्याचे सांगत ते म्हणाले, नियोजनाअभावी कोकण मागासला आहे. कोकणात मोठी धरणे नको, पण लहान बंधारे बांधून हे पाणी अडविण्यावर भर दिला पाहिजे. पाणी अडविण्याची योजना ही कोकणातच तयार होऊ शकते. पाणी अडविण्याचे कोकण हेच मॉडेल अवघ्या जगात दिशादर्शक ठरू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम, पालकमंत्री रवींद्र वायकर, तसेच केंद्रीय मंत्री अनंत गीते हे अनुपस्थित राहिले. (प्रतिनिधी)
नदीचे पुनरुज्जीवन आणि जलसमृद्धी यासाठी डॉ. राजेंद्रसिंह यांनी मांडलेले तीन मुद्दे
नैसर्गिक साधनसामग्रीचे नियोजन आणि पाणी जोरात वाहण्याच्या प्रक्रियेला आळा घालण्यासाठी काही मापदंड लावणे.
कोकणाला महाराष्ट्राचा विशेष दर्जा द्यावा आणि कोकणातील पाणी, जमीन आणि तरुण यांना कोकणातच थांबविण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही करणे.
नदीकिनारी नवे हॉटेल, उद्योग तसेच पर्यटन केंद्रे उभारण्यास मनाई करणे.

Web Title: The need for sustainable irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.