'भाजपसोबत चला, एकनाथ शिंदेंना सन्मानाने परत घ्या;' उद्धव ठाकरेंवर खासदारांचा दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 10:45 AM2022-07-12T10:45:11+5:302022-07-12T10:45:56+5:30
बैठकीत मुख्यत्वे ठाकरे यांनी खासदारांची सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत मते जाणून घेतली.
काहीही करा पण भाजपसोबत चला. आपण भाजपसोबत गेलो नाही तर त्याचा मोठा फटका आम्हा सगळ्यांनाच बसेल, असा आग्रह शिवसेनेच्या बहुतेक खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्रीवरील सोमवारच्या बैठकीत धरला. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना सन्मानाने परत घ्या, यावरही खासदारांनी जोर लावला.
बैठक राष्ट्रपतिपदाबाबत भूमिका निश्चित करण्यासाठी असे म्हटले जात असले तरी हा विषय बैठकीत १५ ते २० मिनिटेच चर्चेत होता. मुख्यत्वे ठाकरे यांनी खासदारांची सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत मते जाणून घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणे ही आपली चूक होती. आपल्याला जनतेने भाजपसोबतच जनादेश दिलेला होता. त्याचा अनादर आपण केला, पण अजूनही वेळ गेलेली नाही. आपण भूमिका बदला आणि भाजपशी पुन्हा युती करा, असा दबाव या खासदारांनी आणला. बैठकीला १८ पैकी पाच लोकसभा सदस्य उपस्थित नव्हते. उपस्थित १३ पैकी दहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत युती करण्याचा आग्रह धरल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही भाजप हाच आपला नैसर्गिक मित्र असून काँग्रेस, राष्ट्रवादी आपल्याला कधीही साथ देणार नाहीत, असे समर्थन बहुतेक खासदारांनी केले. बैठकीला प्रतापराव जाधव, कृपाल तुमाने, विनायक राऊत, सदाशिव लोखंडे, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळे, राजेंद्र गावित, हेमंत गोडसे, ओमराजे निंबाळकर, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे, राजन विचारे हे खासदार उपस्थित होते.
...तर महाविकास आघाडीत फूट
शिवसेना भाजपप्रणीत एनडीएचा घटक पक्ष असतानादेखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभाताई पाटील आणि नंतर प्रणव मुखर्जी या काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. आज शिवसेना ही महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला तर काँग्रेस, राष्ट्रवादीकडून निश्चितच नाराजी व्यक्त केली जाईल. महाविकास आघाडी फुटू शकेल.
मी कायम पक्षासोबत : संजय जाधव
परभणी : मी वारीत असल्यामुळे पक्षाच्या बैठकीला जाऊ शकलो नाही. याची कल्पना मी पूर्वीच पक्षाला दिली होती. शिवसेनेशी मी एकनिष्ठ असून,मी पक्ष सोडणार नाही, असे परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी ‘लाेकमत’शी बोलताना सांगितले. शिवसेनेच्या माध्यमातून मी दोनदा आमदार आणि खासदार झालो. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेशी बांधील असून, पक्षासोबत कधीही गद्दारी करणार नाही. मी अनेक वर्षांपासून वारकरी असून, महिनाभर पायी प्रवास करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलो होतो. आता परतीच्या प्रवासात आहे, असेही खा. जाधव यांनी स्पष्ट केले.
भावना गवळी यांची दांडी
वाशिम : बैठकीला यवतमाळ-वाशिम लाेकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी अनुपस्थित हाेत्या. त्यामुळे जिल्ह्यात चर्चांना ऊत आला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखाेरी केल्यावर खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बंडखाेर शिवसैनिकांचे मत जाणून घेण्याची विनंती केली हाेती. त्यानंतर खा. गवळी यांना शिवसेना प्रताेद पदावरून कमी करण्यात आले हाेते. आता बैठकीला अनुपस्थित राहल्याने जिल्ह्यात भावना गवळी नेमक्या शिवसेना पक्षप्रमुखांसाेबत आहेत, की एकनाथ शिंदेसाेबत, याबाबत तर्क-विर्तक लावले जात आहेत. जिल्ह्यातील संपूर्ण शिवसैनिक ‘मातोश्री’साेबत दिसून येत आहेत.
फोन उचलला नाही
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बाेलाविली हाेती. या बैठकीला अनुपस्थित असल्याने खा. भावना गवळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही. त्यामुळे त्यांच्याशी संभाषण होऊ शकले नाही.
संजय मंडलिक बैठकीसाठी दिल्लीत
कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक लेबर कमिटीच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले आहेत. खासदार विनायक राऊत यांना तशी संजय मंडलिक यांनी पूर्वसूचना दिली असल्याचे मंडलिक यांचे स्वीय सहायक अमर पाटोळे यांनी सांगितले.
मी ‘मातोश्री’सोबतच - हेमंत पाटील
हिंगोली : मी स्वतः आयोजित केलेल्या आषाढी महोत्सवातील कार्यक्रमामुळे मला मुंबईला पोहोचायला उशीर झाला आहे. मी आता औरंगाबादहून मुंबईकडे निघालो आहे. मी ‘मातोश्री’सोबतच आहे, असे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मला यायला उशीर होणार असल्याबाबत मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळविले होते. माझी वेगळी कोणतीही भूमिका नाही, असेही खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले. उद्या हिंगोलीबाबत बैठक असल्याने त्यालाही मी उपस्थित राहणार आहे, असेही ते म्हणाले.
तुमाने म्हणतात, मी तर बैठकीतच
नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबई येथे बोलाविलेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीला आपण उपस्थित होतो. आपण बैठकीत पक्षप्रमुखांशी चर्चा केली. यानंतर सर्व खासदारांच्या अनौपचारिक बैठकीतही भाग घेतला, असे शिवसेनेचे रामटेकचे खा. कृपाल तुमाने यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला तुमाने उपस्थित नव्हते, अशा आशयाचे वृत्त काही वृत्त वाहिन्यांनी प्रसारित केले. यानंतर काही वेळातच तुमाने यांच्या जनसंपर्क कार्यालयाने हे वृत्त खोडूून काढले. संबंधित वृत्त निराधार असून, कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असे आवाहनही त्यांनी केले.