वाहतूक खर्च कमी करून निर्यात वाढविण्याची गरज : नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 03:44 PM2022-02-06T15:44:29+5:302022-02-06T15:45:11+5:30
महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वाहतुकीचा खर्च कमी करणे आवश्यक
मुंबई : जगात भारत व देशात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सर्वाधिक गतीने वाढत आहे. निर्यात वाढवून आयात कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वाहतुकीचा खर्च कमी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र चेंबरने राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. नूतन अध्यक्ष ललित गांधी निश्चितच महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार करून त्यावर काम करतील, याची खात्री असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
चेंबरच्या प्रथेप्रमाणे गडकरी यांच्या हस्ते अध्यक्षीय ट्रॉफी देऊन नूतन अध्यक्ष ललित गांधी यांचे पदग्रहण करण्यात आले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ व अर्थसंकल्पानंतर महाराष्ट्रातील विकासाची नवी दिशा याच विषयावर परिषद व मार्गदर्शन असा संयुक्त कार्यक्रम नितीन गडकरी व केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी मुंबई येथे झाला.
महाराष्ट्र चेंबरचे ४० वे अध्यक्ष कोल्हापूरचे उद्योजक ललित गांधी यांनी चेंबरच्या महोत्सवी वर्षापर्यंतच्या ६ वर्षांची ब्लू प्रिंट सादर केली. भागवत कराड यांनी देशाच्या अर्थसंकल्पात विकासाच्या अनेक योजना केंद्र सरकारने जाहीर केल्या आहेत. पुढचे २५ वर्ष अमृत काळ असेल. त्यादृष्टीने सरकारने काम सुरू केले आहे, असे सांगितले. माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे व माजी मंत्री राज के. पुरोहित यांनी मनोगत व्यक्त केले.
चेंबरच्या पुढाकाराने सहा क्लस्टरची निर्मिती
६ विभागासाठी ६ महिला उद्योजिका क्लस्टर, कृषिपूरक उद्योगांचे क्लस्टर व उत्पादन आधारित उत्पादनांचे ६ क्लस्टर चेंबरच्या पुढाकाराने उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. चेंबरतर्फे वेबसाईट व डिजिटल प्लॅटफॉर्म मोफत असेल. उत्पादक ते विक्रेता व्यापार वृद्धीसाठी व सभासदांच्या व्यापारवृद्धीसाठी ॲप उपलब्ध करून देणार असल्याचे ललित गांधी यांनी सांगितले.