Raj Thackeray: धर्मांध लोकांपासून महाराष्ट्राला वाचवण्याची गरज; अमोल मिटकरींनी लावला ‘तो’ व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 09:07 AM2022-05-02T09:07:34+5:302022-05-02T09:09:03+5:30
महाराष्ट्र सुजाण आहे. कुणी कितीही आदळउपट केली तरी या राज्यात जातीय दंगली भडकणार नाहीत असं अमोल मिटकरी म्हणाले.
मुंबंई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. पवारांना हिंदू शब्दाची एलर्जी असल्याचा आरोप राज यांनी केला. त्याचसोबत राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून राज्यात जातीवाद फोफाळला. जातीद्वेष शरद पवारांनी पसरवला असा आरोप करत औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केले.
राज ठाकरेंच्या(MNS Raj Thackeray) या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी(NCP Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंचा उल्लेख करत ट्विटरवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी अमोल मिटकरींनी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या क्रांतीवीर सिनेमातील एक किस्सा शेअर करत म्हटलंय की, महाराष्ट्र सुजाण आहे. कुणी कितीही आदळउपट केली तरी या राज्यात जातीय दंगली भडकणार नाहीत. हिंदु मुस्लिम ही सद्भावना कायम ठेवणाऱ्या या महाराष्ट्राला धर्मांध लोकांपासून वाचवण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे असं त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र सुजाण आहे. कुणी कितीही आदळउपट केली तरी या राज्यात जातीय दंगली भडकणार नाहीत. हिंदु मुस्लिम ही सद्भावना कायम ठेवणाऱ्या या महाराष्ट्राला धर्मांध लोकांपासून वाचवण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. https://t.co/HdP55Vz4Ho
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 1, 2022
ठाण्याच्या उत्तर सभेनंतर औरंगाबाद येथे होणाऱ्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरच्या राज ठाकरेंच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या सभेची तुलना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या या मैदानावर झालेल्या सभांशी झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या दोन सभा १९८८ साली या मैदानावर झाल्या होत्या. तीच किंबहुना त्यापेक्षा जास्त गर्दी, तसाच जोष, जल्लोष यावेळी दिसला. शिवसेनेसाठी ही खरी डोकेदुखी ठरू शकते असं राजकीय विश्लेषक सांगतात.
राज ठाकरेंनी केले शरद पवारांना टार्गेट
प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरून शरद पवारांनी राज ठाकरेंना नेहमीच टार्गेट केले. मात्र औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी त्याचाच आधार घेत म्हटलं की, मी शरद पवार(Sharad Pawar) यांच्यासाठी काही संदर्भ आणलेत, शरद पवार हे स्वत: नास्तिक आहेत, तेच मी सभेत सांगितलं. मात्र, पवारांना ते झोंबलं, लागलं. त्यानंतर लगेचच पवारांचे मंदिरातले फोटो येऊ लागले. मात्र, पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी स्वत: लोकसभेत सांगितलं होतं की माझे वडील नास्तिक आहेत, असे राज म्हणाले. माझ्या भाषणांमुळे समाजात दुही माजतेय. राज्यासाठी, देशासाठी हे बरं नव्हे असं शरद पवार म्हणतात. राज्यात असे भेदाभेद कोणी निर्माण केले? राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर समाजात तेढ निर्माण झाली, हे मी आधीही म्हटलंय आणि आताही म्हणतोय. शरद पवार मला माझ्या आजोबांची पुस्तकं वाचण्याचा सल्ला देतात. ती पुस्तकं मी आधीच वाचली आहेत. तुम्ही केवळ तुम्हाला हवं तितकंच आणि सोयीचं वाचू नका. मी लेखकांची जात पाहून पुस्तकं वाचत नाही. मी मुळात जातच मानत नाही असं राज ठाकरे म्हणाले.