मराठी साहित्य विदेशी भाषांत अनुवादित होण्याची गरज

By admin | Published: February 4, 2017 01:33 AM2017-02-04T01:33:57+5:302017-02-04T01:33:57+5:30

मराठी भाषेतील भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर यांचे साहित्य भारतीय भाषेत विशेषत: हिंदी भाषेत अनुवादित झालेले आहे. त्यांची हिंदी नवतरुण वाचकांत प्रचंड

The need to translate Marathi literature into foreign languages | मराठी साहित्य विदेशी भाषांत अनुवादित होण्याची गरज

मराठी साहित्य विदेशी भाषांत अनुवादित होण्याची गरज

Next

पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली) : मराठी भाषेतील भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर यांचे साहित्य भारतीय भाषेत विशेषत: हिंदी भाषेत अनुवादित झालेले आहे. त्यांची हिंदी नवतरुण वाचकांत प्रचंड लोकप्रिय आहे. मराठी भाषेतील लेखक हे नोबल पुरस्कार मिळवण्याच्या पात्रतेचे आहेत. मात्र, मराठी साहित्य विदेशी भाषांत पोहोचवण्याची यंत्रणा सरकारने उभी करावी. भालचंद्र नेमाडे व श्याम मनोहर यांनाही नोबल पुरस्कार मिळू शकतो, असे प्रतिपादन हिंदी भाषेतील प्रख्यात कवी विष्णू खरे यांनी येथे केले.
नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज मोठ्या दिमाखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले.
याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षकुमार काळे, माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, ज्येष्ठ साहित्यिक विष्णू खरे, खासदार कपिल पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, स्वागताध्यक्ष गुलाब वझे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक खरे यांनी उपरोक्त मुद्दा उपस्थित केला. साहित्यिक खरे यांनी सांगितले की, मराठी आणि हिंदीत काही फरक नाही. हिंदी व मराठी भाषा या मावसबहिणी आहेत. लेखकाला सन्मान मिळत नाही. त्याचप्रमाणे त्यांनी लिहिलेल्या साहित्यावर काही वादंग झाला, तर त्यांच्या विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते. त्याला संरक्षण मिळत नाही.

यातून झाली नाराजी
मराठी भाषिक असलेले गजानन माधव ‘मुक्तिबोध’ हे हिंदी साहित्यातील शीर्षपुरुष होते. त्यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. हे वर्ष साजरे करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू खरे यांनी केली.

२७ गावांचे काय ते पाहा - वझे : मुख्यमंत्र्यांनी २७ गावांना महापालिकेतून वेगळे करण्याच्या मागणीचा विचार करावा, या मागणीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. तसेच आगरी युथ फोरमच्या कार्यासाठी जागा द्यावी. त्याचबरोबर रेल्वे प्रवाशांचा त्रास कमी कसा होईल, याचा विचार करावा, अशी मागणी संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी केली. वझे यांनी मराठी साहित्यासंदर्भात मागण्याऐवजी २७ गावे व संस्थेच्या जागेच्या मुद्याला अग्रक्रम दिला असल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वझे यांची २७ गावांविषयीची असलेली मागणी याच्याशी मी विसंगत नाही. मात्र, निवडणुकीची आचारसंहिता असल्याने त्यावर मी भाष्य करणार नाही, असे सांगून जे काही बोलेल ते निवडणुकीनंतरच, असे स्पष्ट केले.

संमेलन हे डोंबिवलीसाठी भूषण - चव्हाण
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले, डोंबिवलीला साहित्य संमेलन दिले. त्याबद्दल साहित्य महामंडळाचे आभार मानतो. डोंबिवली ही साहित्यिकांची नगरी आहे. त्यामुळे डोेंबिवलीसाठी साहित्य संमेलन हे भूषण आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात विविध भाषांत होणारी ९० साहित्य संमेलने टिपून त्याचा भेटी या नावाचा विशेषांक ‘डोंबिवलीकर’ मासिकाने काढला, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

सूत्र नव्हे सत्य प्रदान करतो - सबनीस
संमेलनाचे माजी अध्यक्ष सबनीस यांनी सांगितले की, गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे उदात्तीकरण केले जात आहे. त्याची मंदिरे उभी केली जात आहे. ज्या देशात महात्म्याच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरण केले जाते, त्या देशाचे भवितव्य काय असू शकते, असा माझा सवाल आहे. मला गोळ्या घातल्या, तरी मी नथुराम गोडसेच्या नीच प्रवृतीचा निषेध करतो. एक नथुराम जातीने ब्राह्मण होता, म्हणून संपूर्ण ब्राह्मण समाजाकडे संशयाने पाहत राहणे चुकीचे आहे. या प्रवृत्तीला मी बहुजनांचा जातीवाद मानतो. ब्राह्मणांचा इतिहास हा जर पक्षपाती होता, तर बहुजन इतरांनीही पक्षपातीच इतिहास लिहिण्याची काहीच गरज नाही. हे सगळे भाषण करताना सबनीस भावनिक झाले होते. त्यांनी संमेलन अध्यक्षाची सूत्रे काळे यांच्याकडे न देता मी सत्य पचवले आहे, स्वीकारले आहे, त्यामुळे मी काळे यांच्याकडे सत्य प्रदान करतो. त्याला मी सूत्र म्हणणार नाही, असे सबनीस यांनी स्पष्ट केले.

Web Title: The need to translate Marathi literature into foreign languages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.