शिवरायांचा इतिहास समजून घेण्याची आवश्यकता
By admin | Published: February 1, 2017 02:47 AM2017-02-01T02:47:40+5:302017-02-01T02:47:40+5:30
हल्ली विद्यार्थी, युवक विघातक हिंसक वृत्तीकडे वळत आहेत. त्यांना विधायक वृत्तीकडे वळविण्यासाठी आपल्या संस्कृतीची खरी ओळख झाली पाहिजे. छत्रपती शिवरायांचा
वैभववाडी : हल्ली विद्यार्थी, युवक विघातक हिंसक वृत्तीकडे वळत आहेत. त्यांना विधायक वृत्तीकडे वळविण्यासाठी आपल्या संस्कृतीची खरी ओळख झाली पाहिजे. छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यांच्या कार्याची व्याप्ती खूप मोठी आहे. ती सर्वांनी समजून घेतली पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन उद्घाटक खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केले. कोकण इतिहास परिषदेचे सातव्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ. चंद्रकांत काकडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून, प्रास्ताविकात सिंधुदुर्ग जिल्ह्याची सविस्तर माहिती सांगून, अधिवेशनाचा उद्देश कथन केला. यंदाचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार राज्याच्या दप्तरखान्याचे संचालक अशोक खराटे यांना संभाजीराजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. खराटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, मी तीस वर्षे पुराभिलेख संशोधनासाठी वेचली. तो काळ मला कुटुंबीयांसाठी देता आला नाही. तरीही माझे उर्वरित आयुष्यही संशोधनासाठी लागावे, असा आशावाद व्यक्त केला. (वार्ताहर)
समतेच्या लढ्याचा इतिहास शिकवा
राजा दीक्षित यांनी विचार मांडताना, आपण भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास वर्षानुवर्षे शिकवत आहोत. त्याचबरोबर, समतेच्या लढ्याचा इतिहास शिकविला पाहिजे. इतिहास हा आपल्या अस्तित्वाची ओळख आहे. त्याचे चिंतन करणे गरजेचे आहे. ज्यांना विद्यापीठापर्यंत पोहोचता येत नाही, त्यांच्याजवळ विद्यापीठाने पोहोचले पाहिजे. आपण संशोधनाच्या जगात आहोत. बदलत्या वेगाबरोबर आपण पुढील वाटचाल केली पाहिजे. आपल्याकडे ऐतिहासिक साक्षरता कमी आहे. गावकुसाबाहेरच्या वस्तीची मानसिकता बदलली पाहिजे. जातिभेद न मानणारा इतिहास असला पाहिजे, असे स्पष्ट केले.